महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. २१ ऑगस्ट – राज्यात गुरुवारी (ता. २०) बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. तर पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुधवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकण येथील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून पुढील 24 तासांमध्ये त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे चक्राकार वाऱ्यांचा प्रवाह पण वाढेल. परिणामी राज्यातील विविध भागांमध्ये मौसमी पाऊस आणखी प्रबळ होईल असे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात बहुतांश भागांमध्ये (76 टक्क्यांहून अधिक भागात) जोरदार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे, तर 22 ते 23 ऑगस्ट दरम्यान कोकण गोव्यातील तुरळक ठिकाणी पावसाची अतिवृष्टी होण्याचीही दाट शक्यता आहे. मराठवाड्यात बहुतांश भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. अशी माहिती हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली. शहरात बुधवारी 0.8 मिलिमीटर तर लोहगाव येथे 0.3 मिलिमीटर इतका पावसाची नोंद झाली.