महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २८ मार्च ।। राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे अनोखी परिस्थिती निर्माण झाली आहे. होळी सणानंतर अवकाळी पावसाचे ढग राज्याच्या विविध भागात दिसून येत आहेत. चंद्रपूर, लातूर, संभाजीनगर आणि सांगलीमध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. तर विदर्भातील काही ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. सांगलीमध्ये विशेषतः जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने पुढील पाच दिवसात आणखी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच रत्नागिरी, सिंधुदूर्गसह कोकण, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. याचदरम्यान, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुढील ४ दिवस ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर लातूर, बीड, धाराशिव येथील ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान विजांचा कडकडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.