महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २१ ऑगस्ट – कोरोना संकटामुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण घरी गेल्याने, कंपन्या बंद असल्याने बेरोजगार झाले आहेत. अशा औद्योगिक कामगारांसाठी सरकारने खूप चांगली बातमी दिली आहे. या कामगारांना त्यांच्या तीन महिन्याच्या पगाराच्या सरासरीच्या 50 टक्के रक्कम अनएम्पलॉयमेंट बेनिफिटच्या रुपात दिली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 40 लाख कामगारांना त्याचा फायदा होणार आहे. सरकारने नियमांमध्ये सूट देत कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ही योजना आणली आहे. यासाठी तीन महिन्यांचे त्याना मिळणारे वेतन एकत्र करून त्याच्या निम्मे देण्यात येणार आहे. हा फायदा त्याच कामगारांना मिळणार आहे, ज्यांच्या नोकऱ्या 24 मार्च ते 31 डिसेंबर पर्यंत गेल्या आहेत.
मिंट या वृत्तपत्राने याचे वृत्त दिले आहे. यानुसार हा प्रस्ताव कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) च्या बैठकीत मांडण्यात आला होता. ESIC ही सरकारी संस्था असून ती 21000 रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना, कामगारांना ESI स्कीम अंतर्गत विमा पुरविते.
ESIC चे बोर्ड सदस्य अमरजीत कौर यांनी सांगितले की, या पावलामुळे ESIC अंतर्गत विमा संरक्षण असलेल्या योग्य व्यक्तीला त्याचे तीन महिन्यांच्या वेतनाची 50 टक्के रक्कम रोख मदत स्वरुपात दिली जाईल. यासाठी या कामगाराची नोंदणी आणि त्याची नोकरी गेल्याची नोंदणी ESIC कडे व्हायला हवी. यासाठी कामगार ESIC च्या कोणत्याही शाखेत जाऊन नोकरी गेल्याचा अर्ज करू शकणार आहेत. यानंतर ESIC या कामगाराची खरेच नोकरी गेली का ते पडताळून पाहणार आहे. यानंतरच त्याच्या खात्यात ते पैसे पाठविले जातील. यासाठी आधार क्रमांकाची मदत घेतली जाईल.
दरम्यान, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) नुसार कोरोना संकटात जवळपास 1.9 कोटी लोकांनी नोकरी गमावलेली आहे. केवळ जुलैमध्ये 50 लाख लोक बेरोजगार झाले आहेत. ईपीएफओनुसार 4.98 लाख लोक औपचारिकरित्या पुन्हा कामाला लागले आहेत.