तुळजापूरचा कायापालट करणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रविवार दि. ३० मार्च ।। ‘बहुचर्चित पंढरपूर कॉरिडॉरसाठी येत्या तीन महिन्यांत जागा अधिग्रहणाचे काम सुरू करण्यात येणार असून, तसा आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिली. ‘कॉरिडॉरचे काम सुरू करण्यापूर्वी दुकानदार आणि घर जागामालकांशी लोकप्रतिनिधी चर्चा करतील, चर्चेतून योग्य तो मार्ग निघेल, यात तीळमात्र शंका नाही. सर्वांत फायदेशीर असा मार्ग दुकानदार आणि जागामालकांसाठी काढला जाईल,’ असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

‘तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहेच. एक हजार ८६६ कोटी रुपयांच्या या आराखड्यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधीही वितरित केला जाईल. पुढील दोन वर्षांत तुळजापूरचा कायापालट होईल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी तुळजापूर (जि. धाराशिव) येथे दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय सभागृहात तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे सादरीकरण त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ‘मित्र’चे उपाध्यक्ष तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार आदींसह वरिष्ठ अधिकारी, मंदिर संस्थानचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी विकास आराखडा राबवताना ७३ एकर भूसंपादनाची गरज असल्याचे; तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीत तुळजापूर विकास आराखड्यासाठी एक हजार ८६६ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी भूसंपादनाच्या कामाला वेग द्यावा, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली.

तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग घेऊन शाश्वत विकास करण्यासाठी तुळजापूर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

मंदिराचा इतिहास, संस्कृती, वारसा आणि आध्यात्मिक मांगल्याची जपणूक यात होणार आहे. गर्दीचे नियोजन करताना स्मार्ट क्यू सिस्टीम, ऑनलाइन दर्शन व्यवस्था, भाविकांच्या संख्येचे नियमन, रस्त्यांचे रुंदीकरण, वैकल्पिक मार्ग तयार करणे, नवीन पार्किंग व्यवस्था, वाहन पार्किंगपासून मंदिरापर्यंतची वाहतूक सेवा, शौचालयांची संख्या वाढवणे, कचरा वर्गीकरण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य सुविधांचा विस्तार, विश्रांती स्थळे, भाविक सुविधा केंद्राची उभारणी, वॉटर कुलर व आरामदायक शौचालयाची सुविधा, सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी डिजिटल पद्धतीचा (ॲप) वापर अशा काही सुधारणा या आराखड्यात समाविष्ट असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ‘आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आराखड्यातील कामे दोन वर्षांत पूर्ण करण्यात यावेत,’ अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *