Heat Wave Alert: मे-जूनमध्ये उष्णतेचा कहर; पारा ४० अंशांपार जाणार, केंद्र सरकारकडून राज्यांना अलर्ट जारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रविवार दि. ३० मार्च ।। यंदाचा उन्हाळा याआधीच्या तुलनेत जास्त त्रासदायक ठरण्याची चिन्हे मार्चमध्येच दिसल्याने केंद्र सरकारने खबरदारीचे उपाय घेण्याबाबत राज्य सरकारांना सावध केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, उन्हाळ्याच्या काळात सावधगिरीचा सल्ला देतानाच मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे. यंदा उन्हाळ्यात मे-जूनपर्यंत किमान तीन ते सहा तीव्र उष्णतेच्या लाटा देशावर आदळतील, असाही इशारा हवामान विभागाने दिला आहे.

या काळात असह्य उष्ण वाऱ्याचे झोत म्हणजे ‘लू’चाही प्रकोप जाणवेल. दिवसाचे तापमान सरासरी ४० अंशांच्या पुढे राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नुकत्याच दिलेल्या पत्रात नागरिकांच्या आरोग्यावरील उष्णतेच्या परिणामांचे निरीक्षण आणि व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. मार्च ते मे आणि जून या कालावधीत, रोज दुपारी १२ ते चारपर्यंत थेट सूर्यप्रकाशाचा संपर्क व चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक्सचे सेवन टाळावे, अशा सूचना नागरिकांना द्याव्यात व त्याबाबत जनजागृती मोहिमा राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, राजधानी दिल्लीत शुक्रवारपर्यंत सायंकाळनंतर पहाटेपर्यंत जोरदार वारे वाहत असल्याने लोकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत असला तरी उद्या, रविवारपासून तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज सफदरजंग हवामान केंद्राने वर्तविला आहे. पुढचे किमान तीन ते चार महिने दिल्लीवर उष्णतेच्या लाटा आदळण्याचाही अंदाज वर्तविण्यात आला असून, नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

केंद्राचे प्रमुख दिशानिर्देश
■ कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात प्रतिव्यक्ती दोन लिटर पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे
■ दिवसभर चालणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वैद्यकीय पथके तैनात करावीत
■ वैद्यकीय पथकांकडे ओआरएस सोल्युशन आणि आइस पॅक असावेत
■ उष्णतेमुळे बाधित रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी आरोग्य केंद्रात शीतकरण प्रणालीची व्यवस्था असावी
■ उष्णतेमुळे किंवा उष्णतेच्या लाटेचा फटका बसलेल्यांची माहिती रोज राज्य आणि केंद्र पातळीवर पाठवणे आरोग्य केंद्रांना बंधनकारक
■ प्रत्येक नागरिकानेही हवामान खात्याच्या उष्णतेच्या लाटेबाबतच्या अंदाजाकडे विशेष लक्ष द्यावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *