महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। रविवार दि. ३० मार्च ।। रमजान ईदनिमित्त शहरातील ईदगाह, गोळीबार मैदान चौक येथे होणार्या नमाजपठणाच्या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी होते. त्या पार्श्वभूमीवर चंद्र दर्शनानुसार संभाव्य 31 मार्च अथवा 1 एप्रिल या दिवशी गोळीबार मैदान भागात तात्पुरता वाहतूक बदल करण्यात आला आहे.
वाहनधारकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले असून त्या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.सकाळी 6 ते 11.30 किंवा नमाज पठण पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली. सोलापूर रोडवरील भैरोबानाला चौक ते गोळीबार मैदान चौक या दरम्यानची वाहतूक बंद राहील.
या कालावधीत सोलापूरकडून स्वारगेटला जाणारी जडवाहने (फक्त मार्केट यार्डकरिता) व इतर वाहने ही भैरोबानाला चौकातून डावीकडे वळून प्रिन्स ऑफ वेल्स रोडने लुल्लानगर चौकमार्गे इच्छित स्थळी जातील. पुणे स्टेशन व पुणे शहरात जाणारी जडवाहने यांना पूर्णतः बंदी असून हलकी वाहने इम्प्रेस गार्डन रोडमार्गे इच्छित स्थळी जातील.
मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक दरम्यानची वाहतूक, सीडीओ चौकातून गोळीबार चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. या कालावधीत लुल्लानगरकडून येणारी वाहने सीडीओ चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी जातील.
तसेच खटाव बंगला चौकातून उजवीकडे वळून नेपीयर रोडने मम्मादेवी चौकातून सरळ बीशप स्कूल मार्गे इच्छित स्थळी जातील. त्याकरिता खटाव बंगला चौकातील राईट टर्न तात्पुरता सुरू करण्यात येईल. स्वारगेटकडून सोलापूरकडे जाणारी वाहने ही सेव्हन लव्हज चौक ते गोळीबार चौकदरम्यान पूर्णतः बंद राहतील.
स्वारगेटकडून येणारी वाहने सेव्हन लव्ह चौकातून उजवीकडे वळून सॅलेसबरी पार्क रोडने सीडीओ चौकात येऊन उजवीकडे वळून खटाव चौकात डावीकडे वळून इच्छित स्थळी जातील किंवा खटाव चौकातून लुल्लानगरमार्गे सोलापूरला जातील. जुनी सोलापूर बाजार चौकी चौक ते गोळीबार चौक दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद राहील.
वाहनधारकांनी खाणे मारुती चौकाकडून पुलगेट डेपो मार्गे सोलापूर बाजार चौक सरळ नेपीयर रोडने खटाव बंगला मार्गे इच्छित स्थळी जावे, मम्मादेवी मार्गे सोलापूरकडे जावे. लुल्लानगर चौकातून गोळीबार चौकाकडे येणारी जड वाहने पूर्णतः बंद राहतील.
याशिवाय शहरातील अन्य भागातील ईदगाह मैदानावर नमाज पठण होणार असल्याने सदर भागातील वाहतुकीच्या परिस्थितीनुसार, तेथील वाहतूक बंद अथवा अन्य मार्गाने वळविण्यात येईल, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.