महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। सोमवार दि. ३१ मार्च ।। राज्यात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. रविवारी मुंबईचे तापमान 36 अंशावर पोहोचले होते. मार्च महिन्याच्या अखेरीसच तापमानात कमालीची वाढ झाल्याची नोंद करण्यात येत आहे. मात्र, एकीकडे तापमानात वाढ होत असताना अवकाळी पावसाचादेखील इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये पूर्व मोसमी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिना संपायच्या आधीच तापमानात वाढ झाली होती. संपूर्ण मार्च महिन्यातही उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. एप्रिल आणि मेमध्ये उकाडा आणखी वाढणार आहे. मुंबईत सकाळपासूनच उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली आहे. तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागतोय. त्यामुळं चक्कर येण्याच्या, पित्ताचा त्रास होण्याच्या तक्रारी नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. केरळ आणि दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात बदल होणार असून याचा परिणाम राज्यावर होणार असून येत्या दोन ते तीन दिवसात परिणाम दिसून येणार आहे. वातावरणातील बदलामुळे पुढील तीन ते चार दिवसांत जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे
अवकाळी पावसाचा इशारा
मुंबईसह ठाणे, पालघर रायगड जिल्ह्यात सोमवार, मंगळवार, आणि बुधवार काही भागात पूर्वी मोसमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यावेळी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यावेळी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील.
31 मार्च रोजी हवामान विभागाने सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, रायगड, रत्नागिरी, मुंबई, जळगाव, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्येही विजाच्यां कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तववण्यात आली आहे.
दरम्यान, अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठा प्रमाणात बसू शकतो. रब्बी हंगामातील पिकांची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पावसामुळे रब्बी हंगामातील काढण्यासाठी आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आव्हान कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे वातावरणात होणाऱ्या बदलामुळे वाढलेल्या तापमानात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.