ऑनलाईन शिक्षणाचे वास्तव NCERT च्या सर्वेक्षणात उघड झाले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २१ ऑगस्ट – कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सरकार ऑनलाईन शिक्षणाबाबत आग्रही दिसते, पण प्रत्यक्षात स्थिती काही वेगळीच आहे. ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी देशभरातील 27 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप अशी कुठलीही सुविधा नसल्याचे धक्कादायक वास्तव राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात NCERT च्या सर्वेक्षणात समोर आले आहे, त्याचबरोबर 28 टक्के विद्यार्थी आणि पालकांसमोर प्रामुख्याने वीजेची समस्या असल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सीबीएसईशी संबंधित शाळांचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक तसेच प्राचार्यांसह एकूण 34000 लोकांनी एनसीईआरटीच्या या सर्व्हेक्षणात सहभाग घेतला होता. त्यांचे असे म्हणणे आहे की, प्रभावी शैक्षणिक उद्देश्य प्राप्तीसाठी उपकरणांचा वापर करण्याच्या माहितीचा अभाव तसेच शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाच्या पद्धतीची पूर्ण माहिती नसल्याचे शिकवण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

एनसीईआरटीच्या सर्व्हेक्षणानुसार, आपल्याकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप नसल्याचे जवळपास 27 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या संकटकाळात शिक्षणासाठी बहुतांश विद्यार्थी हे मोबाईल फोनचा वापर करत आहेत, पण ज्यांच्याकडे दोन्हीपैकी काहीच नाही, अशा विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या सर्वेक्षणानुसार पाठ्यपुस्तक आणि त्यांच्या जवळ असलेल्या पुस्तकांचा वापर करुन जवळपास 36 टक्के विद्यार्थी अभ्यास करत आहेत. दुसऱ्या क्रमांकावर शिक्षक आणि प्राचार्यांकडे लॅपटॉप हे माध्यम आहे, ते शिक्षणासाठी ज्याचा वापर करत आहेत. महामारीच्या या काळात टीव्ही आणि रेडिओ सर्वात कमी वापरली जाणारी उपकरणे आहेत. या दरम्यान शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगला संवाद होत नसल्याचे देखील समोर आले आहे.

तर जवळपास 50 टक्के विद्यार्थ्यांकडे पुस्तके उपलब्ध नाहीत. ई बुक्स एनसीईआरटीच्या वेबसाईट आणि दीक्षा पोर्टलवर उपलब्ध आहेत. पण ई पाठ्यपुस्तकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता नसल्याचे समोर आले आहेत. यात अनेकांचे म्हणणे असे आहे की, गणित विषय ऑनलाईन माध्यमातून शिकवणे आणि शिक्षण घेणे अवघड आहे. अनेक सिद्धांत तसेच प्रयोग गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये असल्यामुळे हे विषय शिकवणे कठिण जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *