बाळासाहेबांचे विचार राखणार की…; फडणवीसांचं ठाकरेंना थेट आव्हान; उद्याचा दिवस महत्त्वाचा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ एप्रिल ।। मोदी सरकार उद्या वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडणार आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. संसदेच्या संयुक्त समितीच्या अहवालानंतर सुधारणा करण्यात आलेल्या विधेयकावर उद्या लोकसभेत चर्चा होईल. त्यानंतर त्या विधेयकाच्या मंजुरी प्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल. हे विधेयक लोकसभेत मंजूर करुन घेण्याची जबाबदारी दस्तुरखुद्ध केंद्रीय मंत्री अमित शहांनी घेतली आहे. भाजपचे चाणक्य मानले जाणारे अमित शहा विधेयक लोकसभेत मांडलं जाण्यापूर्वी सक्रिय झाले आहेत. तर दुसरीकडे सगळ्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारांच्या भूमिकेकडे लागलं आहे.

भाजपची साथ सोडल्यानंतर ठाकरेंनी सॉफ्ट हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला. आपण हिंदुत्त्व सोडलं नसल्याचं उद्धव ठाकरे वारंवार सांगतात. आता वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेतील ठाकरेंचे ९ शिलेदार काय पवित्रा घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. त्यासाठी त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ‘वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?,’ असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

लोकसभेत भाजपकडे स्वबळावर बहुमत नाही. त्यांचं सरकार नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष यांच्या पाठिंब्यावर अस्तित्त्वात आलं आहे. या दोन्ही पक्षांची विचारधारा हिंदुत्त्ववादी नाही. त्यामुळे या पक्षांच्या भूमिकांकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या दोन्ही पक्षांनी वक्फ सुधारण विधेयकाला पाठिंबा द्यावा यासाठी अमित शहांनी बैठकांचं सत्र सुरु केलं आहेय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *