![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ एप्रिल ।। मार्च महिन्यापासून अर्थात साधारण शिमगोत्सवापासूनच कोकणच्या दिशेनं अनेकांचेच पाय वळू लागतात. एप्रिलच्या अखेरीस तर, कोकणच्या दिशेनं जाणाऱ्यांचा आकडा दुपटीनं वाढतो. कारण ठरते ती म्हणजे शाळा- कॉलेजांना लागलेली मे महिन्याची सुट्टी आणि नोकरीच्या निमित्तानं शहरात धकाधकीचं आयुष्य जगणाऱ्यांना मिळालेली काहीशी उसंत.
थोडक्यात उन्हाळी सुट्टीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणं यंदासुद्धा अनेकांचेच पाय कोकणच्या दिशेनं वळणार असून, त्यासाठी कोकण रेल्वे विभागही सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या दिवसात उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या गर्दीचा वाढलेला आकडा कमी करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेच्या वतीने मुंबई ते मडगावजदरम्यान विशेष रेल्वेगाड्यांची सोय करण्यात आली आहे. ज्यामुळं कोकणात जाणाऱ्यांना प्रवासाचे पर्याय नक्कीच उपलब्ध असतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी
6 एप्रिल ते 4 मे दरम्यान दर रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 01104/01103 ही रेल्वेगाडी निर्धारित दिवसांमध्ये दर रविवारी सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी मडगाव जंक्शन येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01103 ही लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी मुंबईतील LTT येथून 7 एप्रिल ते 5 मेपर्यंत दर सोमवारी सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी प्रवासासाठी मार्गस्थ होईल आणि मडगावला रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल.
कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार ही रेल्वे?
ही साप्ताहित विशेष रेल्वेगाडी करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबेल.
कशी असेल आसनव्यवस्था?
या विशेष रेल्वेगाडीला 20 एलएचबी डबे असून, द्वितीय श्रेणी वातानुकूलित असा 1 डबा, तृतीय श्रेणी वातानुकूलितचे 3 डबे, शयनयान अर्थात स्लीपर कोचचे 8 डबे, सामान्य (General) 4 डबे, तृतीय श्रेणी इकॉनॉमी 2 डबे, जनरेटर कार 1 डबा आणि एसएलआर 1 डबा अशी एकंदर रचना असेल. त्यामुळं कोकणात जाण्यासाठीचा हा आणखी एक पर्याय तुमच्या सेवेत हजर असून आता नेमका प्रवास कधी करायचाय हे मात्र तुम्ही ठरवा!!!
