महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ एप्रिल ।। राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. एकीकडे काही जिल्ह्यांमध्ये तापमान वाढले आहे तर काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस झोडपून काढत आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होत आहे. आज देखील हवामान खात्याकडून विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ वगळता उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज वादळी वारे, मेघर्गना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊ पडण्याची शक्यता आहे. त्याचसोबत गारपीट देखिल होण्याची शक्यता आहे. कोकणाला देखील अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे.
आज विदर्भातील चंद्रपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असू हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून याठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे.
हवामान खात्याने ३ एप्रिल आणि ४ एप्रिल रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याकडून आज आणि उद्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, सातारा, सोलापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. तर अहमदनगर, पुणे घाट, कोल्हापूर घाट, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.