Pune News : पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर एसटीला दररोज दंड, कारण धक्कादायक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ एप्रिल ।। एखाद्या चालकाने एक्स्प्रेस वेवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले, तर एसटी महामंडळ त्याच्या वेतनातून तो दंड वसूल करते. परिवहन विभागाकडून येणाऱ्या दंडावर वेळ व ठिकाण असते. त्यावरून त्या दिवशी व वेळी बस कोण चालवत होते, याची माहिती मिळते. त्यानुसार तो दंड चालकाच्या वेतनातून कापून घेतला जातो. तो परिवहन विभागाकडे भरला जातो, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (एक्स्प्रेस वे) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वचक बसविण्यासाठी लावलेल्या कॅमेऱ्यांतून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस सुटलेल्या नाहीत. दररोज एसटीच्या एका बसवर नियमभंगाची दंडात्मक कारवाई (चलन) होत असल्याने वेगमर्यादा पाळण्यासह इतर नियमांचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना एसटी प्रशासनाने सर्व चालकांना दिल्या आहेत.

‘एक्स्प्रेस वे’ वरील अपघात कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तरीही अनेक वाहन चालक वेगमर्यादेचे उल्लंघन करतात. तसेच, मार्गिकेचे उल्लंघन करणे (लेन कटिंग), सीटबेल्ट न घालणे अशा प्रकारच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे.

एसटी महामंडळाच्या पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या बहुतांश बससाठी ‘एक्स्प्रेस वे’ वरून धावतात. त्यामध्ये शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातील सर्वाधिक बस आहेत. परंतु, या बसच्या चालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने एसटीवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दररोज एका बसवर दोन ते तीन ठिकाणी नियमभंगाची कारवाई होत असल्याने एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सर्व चालकांना एक्स्प्रेस-वे वर नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

एसटी महामंडळाच्या पुणे विभागाप्रमाणेच इतर विभागाच्या अनेक बस एक्स्प्रेस वे वरून धावतात. त्यांच्या बसवरही दंड पडत आहे. त्यामुळे सातारा विभागाने त्यांचे एक पथक तयार करून, एक्स्प्रेस वे वर कोणत्या भागात वेगाची किती मर्यादा आहे याची माहिती संकलित केली. ती सर्व चालकांना दिली आहे. ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली.

चालकाच्या वेतनातून दंड वसूल
एखाद्या चालकाने एक्स्प्रेस वेवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले, तर एसटी महामंडळ त्याच्या वेतनातून तो दंड वसूल करते. परिवहन विभागाकडून येणाऱ्या दंडावर वेळ व ठिकाण असते. त्यावरून त्या दिवशी व वेळी बस कोण चालवत होते, याची माहिती मिळते. त्यानुसार तो दंड चालकाच्या वेतनातून कापून घेतला जातो. तो परिवहन विभागाकडे भरला जाती, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *