महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ एप्रिल ।। इंडियन प्रीमियर लीग २०२५ हंगामाची मुंबई इंडियन्स संघासाठी निराशाजनक सुरुवात झाली आहे. पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने गमावले असून संघाची सलामी जोडी व गोलंदाजीची धारही कमी दिसत आहे. आता संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबद्दल अनिश्चितता निर्माण झाल्याने चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.
जसप्रीत बुमराह १ एप्रिलपर्यंत मुंबई इंडियन्स संघात दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, बुमराहचे आयपीएल २०२५ मध्ये पुनरागमन लांबणीवर पडले आहे. त्याच्या परतण्याची कोणतीही निश्चित तारीख अद्याप ठरलेली नाही.
बुमराहला संघात परतण्यासाठी एप्रिल महिन्याचा मध्य उजाडण्याची शक्यता आहे. याउलट, संघातील दुसरा गोलंदाज आकाशदीप हा १० एप्रिलपर्यंत संघात पुनरागमन करू शकतो, असे समजते आहे. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीवर मोठा परिणाम होत असून, खेळाडू त्याला लवकरात लवकर संघात पाहण्यास उत्सुक आहेत.