महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ एप्रिल ।। पुणे मेट्रो प्रवाशांची संख्या मागील तीन महिन्यांपासून घटत चालली आहे. मार्च महिन्यात प्रवाशांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम तिकीट उत्पन्नावरही झाला आहे. जानेवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात सर्वात जास्त पाच लाख प्रवाशी घटले आहेत.
पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होऊन संपूर्ण 33 किलोमीटर मार्गावर मेट्रोसेवा सुरू झाली असली तरी अपेक्षित वेगाने प्रवासी संख्या वाढताना दिसत नाही. मंडई,स्वारगेट ही स्थानके सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या दोन लाखाच्या पुढे पोहोचणे अपेक्षित असताना अद्यापही सरासरी प्रवासी संख्या एक लाख 60 हजारांच्या दरम्यानच आहे.
प्रवाशांना मेट्रोस्थानकापर्यंत सहज जाता यावे यासाठी पुणे मेट्रोने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. मेट्रोतून प्रवास करणारे दैनंदिन प्रवासी सरासरी 1लाख 44 हजार करतात, पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या 63 हजार इतकी आहे तर वनाज ते रामवाडी मार्गावरील दैनंदिन प्रवास संख्या 82 हजार आहे.
चार महिन्यातील प्रवासी संख्या आणि उत्पन्न
डिसेंबर 2024 मध्ये महिन्यात प्रवाशांची संख्या 46 लाख 94 हजार 147 इतकी होती, तर तर 7 कोटी 38 लाख उत्पन्न मिळाले होते. जानेवारी 2025 मध्ये हीच संख्या 49 लाख 64 हजार 224 आणि उत्पन्न 7 कोटी 87 लाख उत्पन्न तर फेब्रुवारी मध्ये 43 लाख 7000 प्रवासी तर 7 कोटी 73 लाख उत्पन्न होते. मार्चमध्ये 44 लाख 81 हजार 613 प्रवासी तर 7 कोटी 1 लाख इतके उत्पन्न मिळाले.