महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ एप्रिल ।। नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील श्री नृसिंह सरस्वती देवस्थान समितीतर्फे पावणेदोन एकर जागेवर 128 खोल्यांचे भव्य भक्तनिवास उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 13 कोटी 75 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे बांधकाम देवस्थान निधी आणि भाविक देणगीतून पूर्ण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी 11 वाजता देवस्थान सभागृहात बैठक बोलविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू-पुजारी यांनी संस्थांच्या पुढे या भक्तनिवासाच्या संकल्पनेचा प्रस्ताव सादर केला. दरम्यान, भक्तनिवास उभारणीसाठी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी प्रशासकीय मान्यता आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्याचे अध्यक्ष काळू-पुजारी यांनी सांगितले.
नृसिंहवाडी दरम्यानच्या शिरोळ सलगर-सदलगा महामार्गालगत देवस्थानच्या जागेवर जी+5 अशा संकल्पनेच्या भक्तनिवासाची उभारणी होणार आहे. यावेळी बैठकीस चिटणीस गजानन पुजारी, संतोष खोंबारे, संजय पुजारी, पांडुरंग पुजारी, सदाशिव पुजारी, सोनू पुजारी उपस्थित होते. सांगली येथील बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर सामाणी बंधू यांच्याकडे बांधकामाचा ठेका देण्याचा सर्वानुमते ठराव करण्यात आला. याबाबतची सामाणी यांनी भक्तनिवास प्रारूप आराखड्याची चित्रफीत सादर केली. या बैठकीत बाळासाहेब ऊर्फ मुकुंद वाडीकर, पुंडलिक पुजारी, भालचंद्र पुजारी, अरुण पुजारी, सतीश खोंबारे, विकास पुजारी, विनोद पुजारी, अनिकेत जेरे, गजानन पुजारी आदी उपस्थित होते.