महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ एप्रिल ।। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे (एसटी) वर्षभरात १४ हजार १८० तक्रारी आल्या. त्यापैकी केवळ ५१३ तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेले हे महामंडळ प्रवाशांच्या तक्रारीच बेदखल करत असल्याचे चित्र आकड्यांवरून दिसत आहे.
राज्यात एसटी महामंडळाच्या सुमारे १४ हजार बसेसमधून दररोज सुमारे ४५ ते ४८ लाख जण प्रवास करतात. एसटीच्या विविध योजनांमुळे प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दरम्यान, प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. टोल फ्री क्रमांकावर फोन करून, ई-मेल किंवा एसटीच्या संकेतस्थळावर हे प्रश्न मांडले जातात. पण, त्यांना न्याय देण्यात प्रशासकीय अधिकारी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.
या तक्रारींचा समावेश
बसस्थानकातील शौचालये अस्वच्छ, बस वेळापत्रकानुसार नाही, ठरलेल्या थांब्यावर बस थांबत नाही, ऑनलाइन रिझर्व्हेशनचे पैसे परत मिळाले नाहीत, बस रस्त्यातच बंद पडणे (ब्रेक डाऊन), अस्वच्छता, चालक-वाहकाकडून असभ्य वागणूक आणि गैरसोयी याबाबत प्रवाशांकडून तक्रारी नोंदवल्या जातात. मात्र, अधिकऱ्यांचा संपर्क क्रमांक प्रसिद्ध करुनही तक्रारींची दखल घेतली जात नाही.
जाहिरातीचे उत्पन्न १०० कोटींपर्यंत वाढवा!
एसटी महामंडळाच्या बस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवावे, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. परिवहन आयुक्तालय येथे राज्य परिवहन महामंडळाची आढावा बैठक पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. सध्या ज्या जाहिरात संस्थांना काम दिले आहे, त्यांच्याकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांचे करार रद्द करावेत, अशा सूचना देऊन मंत्री सरनाईक म्हणाले की, यासाठी चांगले उत्पन्न देणाऱ्या संस्थांची निवड करावी. सध्या जाहिरातीच्या माध्यमातून महामंडळाला २२-२४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामध्ये वाढ करून हे उत्पन्न १०० कोटी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.
‘प्रवासी राजा दिन’ कागदावरच
एसटीची गुणवत्ता सुधारण्यासाठी महामंडळाने १५ जुलै २०२४ पासून ‘प्रवासी राजा दिन’ उपक्रम सुरू केला. यामध्ये प्रवासी, प्रवासी संघटनांना समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात सोमवारी आणि शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मांडता येतात. मात्र, बहुतांश आगारांत हा उपक्रम सुरूच करण्यात आलेला नाही. त्यामुळे ‘प्रवासी राजा दिन’ कागदावरच राहिला आहे.
येथे मांडता येते तक्रार
संकेतस्थळ – https://msrtc.maharashtra.gov.in
फोन क्रमांक – १८००-२२१-२५० ई-मेल आयडी – gmtraffic@msrtc.gov.in
महामंडळाकडे आलेल्या तक्रारींची स्थिती
(कालावधी : एप्रिल २०२४ ते मार्च २०२५)
१४,१८०
संकेतस्थळावर आलेल्या
१५९
आपले सरकार पोर्टलवरील
५१३
तक्रार सोडवलेली प्रकरणे
१,२३१
संबंधित विभागाला पाठविलेल्या तक्रारी
१२,४१२
प्रलंबित
एसटी महामंडळाकडे प्राप्त तक्रारींचा तातडीने निपटारा करुन प्रवाशांच्या अडचणी सोडवाव्यात. अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत.
– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री,