महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ एप्रिल ।। राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. आठवडाभरापासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अन् गारपीट झाली. यामुळे अनेक जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक असे वातावरण आहे. असे असले तरी दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात आज उष्णतेचा चटका वाढण्याची शक्यता आहे. तर उर्वरीत राज्यामध्ये ढगाळ हवामानासह कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
आज कोकणात उष्ण आणि दमट वातावरण राहिल. उन्हाच्या झळ्या तीव्र असतील. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आज पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात आज काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिल. उष्णता वाढणार असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले. त्याचसोबत जीवितहानी आणि वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसला. कांदा, गहू, फळ भाज्या, द्राक्ष बागा, आंबा यांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे.