महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ एप्रिल ।। पुण्याचा विस्तार मोठा झाला आहे. त्यामुळे भविष्यात शहराचा विकास वेगाने करायचा असेल, तर पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारावेच लागेल, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. हे करताना शेतकर्यांचे नुकसान होऊ देणार नाही, याची ग्वाहीदेखील पवार यांनी दिली.
पुणे महानगर प्रदेश विकास परिषदेची आज आढावा बैठक विधानभवन येथे पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले की, विमानतळ ही संपूर्ण पुणे जिल्ह्याची गरज आहे. पुण्यातील अनेक उद्योग व मोठ्या आयटी कंपन्या शहराबाहेर जात असून, त्या चेन्नई व बंगळुरूत जात आहेत.
हे थांबवायचे असेल तर पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ आवश्यक आहे. पुरंदर येथील विमानतळाची जागा 10 वर्षांपूर्वीच निश्चित झाली असून, त्यापूर्वी बारामतीतील दोन गावांचा विचार झाला होता. मात्र, राजकारणामुळे ही जागा अंतिम झाली आहे. विमानतळासाठी भूसंपादन सुरू झाले असून, हे करताना शेतकर्यांचे नुकसान होऊ देणार नाही. समृद्धी महामार्ग व पुणे-मुंबई द्रुतगती मार्गासाठी जसा मोबदला देण्यात आला, तसाच मोबदला विमानतळासाठी दिला जाईल.
पीएमआरडीएच्या आराखड्याबद्दल अनेक तक्रारी
पीएमआरडीएच्या रद्द झालेल्या आराखड्यासंदर्भात अजित पवार म्हणाले की, या आराखड्याबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शेतकर्यांच्या जमिनींवर चुकीच्या पद्धतीने आरक्षणे टाकण्यात आली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केल्यावर त्यांना मी जे चुकीचे झाले ते दुरुस्त करावे लागेल, असे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा आराखडा रद्द केला. सध्या नवीन आराखडा तयार करण्याचे आदेश दिले असल्याचे पवार म्हणाले.