महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ एप्रिल ।। पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानाचा प्रशासनातील प्रभावी वापर याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत माहिती देण्यात आली. आपल्या नेहमीच्या कामकाजात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेचे अधिकारी अधिक स्मार्ट होणार आहेत.
महापालिकेत झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपायुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, संदीप खोत, अण्णा बोदडे, सचिन पवार, डॉ. प्रदीप ठेंगल, नीलेश भदाने, सीताराम बहुरे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी, मनोज सेठिया, क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक समीर पांडे व विनायक कदम यांनी मार्गदर्शन केले.
विविध ई-गव्हर्नन्स टूल्सचे प्रशिक्षण
अधिकार्यांना चॅट जीपीआय, भाशिनी, डिजी लॉकर, एपीआय आणि इतर ई-गव्हर्नन्स टूल्सचे प्रशिक्षण देण्यात आले. महापालिकेच्या आगामी योजनांमध्ये यापैकी अनेक साधनांचा समावेश करून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा पुरवण्यात येणार आहेत.
एयआयद्वारे कार्यक्षमतेत वाढ
दैनंदिन प्रशासकीय कामकाजात एआयद्वारे कार्यक्षमता वाढवणे. मानवी चुका कमी करणे, नागरिकांच्या अपेक्षांनुसार सेवा पुरवणे. डेटावर आधारित निर्णय प्रक्रिया राबविणे. शासकीय पत्रव्यवहार, अहवाल लेखन, योजना प्रस्तावना, नागरिक तक्रार निवारण इत्यादींसाठी एआयचा वापर केला जाणार आहे. डिजिटल गव्हर्नन्स, डिजिटल लीडरशिप आणि स्मार्ट सिटीमध्ये एआयची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. एआय वापराचे धोके आणि जबाबदार्या, गुप्तता, नैतिकता, चुकीची माहिती आणि नियमन आदीबाबत माहिती देण्यात आली.
अधिक गतिमान सेवा मिळणार
प्रशासन अधिक गतिमान, कार्यक्षम व नागरिक केंद्रित बनविण्याच्या दृष्टीने अधिकार्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा. डिजिटल प्रशासन व पारदर्शकता, वाहतूक व्यवस्थापन
सुधारणा, स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छता सुधारणा, पिण्याचे पाणी व स्वच्छता सुधारणा, स्मार्ट शहर सुरक्षा व सार्वजनिक जागा सुधारणे, तंत्रज्ञानाधारित सुधारणा व महसूल वाढ या सर्व कामांत सुधारणा करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महापालिका करणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
दैनंदिन कामे सुलभ
‘एआय’चा वापर केल्यामुळे अधिकारी व कर्मचारी दैनंदिन कामकाजातील नोंदी व्यवस्थापन, पत्रव्यवहार, अहवाल लेखन, नागरिकांच्या तक्रारींचे विश्लेषण जलद, अचूक आणि परिणामकारक पद्धतीने करू शकतील. चॅट जीपीटीसारखी साधने शासकीय मजकूर तयार करण्यात वेळ व कष्ट वाचवतात. डेटा विश्लेषण टूल्स धोरणनिर्मितीत मदत करतात. हे तंत्रज्ञान भविष्य नाही, तर आजच्या कामाचा एक भाग बनू लागले आहे. अधिकारी व कर्मचार्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण वेळोवेळी देण्यात येणार आहे, असे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी सांगितले.