CM Devendra Fadnavis :ज्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला असेल, त्यांच्यावर कडक कारवाई करू : मुख्यमंत्र्यांची भूमिका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ एप्रिल ।। ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनेक प्रकारचे उपचार रुग्णांवर होतात. त्यामुळे सर्व चूक रुग्णालयाची आहे, असे म्हणू शकत नाही. मात्र, या केसमध्ये नक्कीच त्यांनी असंवेदनशीलपणा दाखवला आहे. ज्या ठिकाणी चूक आहे, तिथे चूक म्हणावे लागेल,’’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच, धर्मादायमधील सर्व व्यवस्था ऑनलाइन प्रणालीद्वारे एकाच व्यासपीठावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस हे शनिवारी महसूल विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या समारोपासाठी आले होते. त्यावेळी ईश्‍वरी भिसे यांच्या नातेवाइकांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर संवाद साधताना फडणवीस म्हणाले, या प्रकरणात संपूर्ण चौकशी होईलच आणि अहवालानुसार कारवाई सुद्धा. पण, आज त्या कुटुंबापुढे सर्वांत मोठा प्रश्न, त्या जन्माला आलेल्या दोन अपत्यांच्या आरोग्याचा आहे. मुदतपूर्व प्रसुतीमुळे ही दोन्ही अपत्य आज ‘एनआयसीयू’मध्ये आहेत आणि आणखी काही काळ त्यांना तेथे उपचार घ्यावे लागणार आहेत. त्याचा खर्च सुद्धा अधिक आहे. त्यामुळे त्या दोन्ही मुलींचा उपचारांचा खर्च हा मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश मी दिले आहेत.‘‘भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी एक निश्‍चित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण धर्मादाय व्यवस्था एका ऑनलाइन व्यासपीठावर आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे रुग्णालयात किती खाटा आहेत, त्या रुग्णांना दिल्या जातात की नाही, हे सर्व समजण्यासाठी व्यवस्थेत सुधारणा केल्या जातील. ही व्यवस्था मुख्यमंत्री आरोग्य कक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय त्यांची चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर आम्हाला आनंद आहे. जोपर्यंत समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत या प्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही.’’

आंदोलन करणे योग्य नाही…
रुग्णालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही. सरकारने या घटनेची दखल घेतली आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, पण दिखावा बंद झाला पाहिजे. एखाद्या रुग्णालयाची झालेली तोडफोड समर्थनीय नाही. त्यामध्ये भाजपची महिला आघाडी सहभागी असेल तरी हे कृत्य चूक आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

भिसे यांच्या नातेवाइकांची भेट
ज्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला असेल, त्यांच्यावर कडक कारवाई करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्‍वासन दिल्याचे भिसे यांच्या नातेवाइकांनी सांगितले. यावेळी आमदार अमित गोरखे, सुशांत भिसे यांची बहीण प्रियांका पाटे, अक्षय पाटे आणि मावशी योगिता बढे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *