महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ एप्रिल ।। तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांकडून अथवा त्यांच्या नातेवाइकांकडून अनामत रकमेची मागणी करू नये. रुग्णांवर पहिल्यांदा उपचार करावेत, अशी नोटीस महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व 860 रुग्णालयांना पाठवली आहे. आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी यासंबंधीची माहिती दिली.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनामतची रक्कम न भरल्यामुळे तातडीच्या उपचारांअभावी ईश्वरी भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे खासगी रुग्णालयात रुग्ण भरती करताना मागण्यात येणार्या अवाच्या सवा अनामत रकमेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मंगेशकर रुग्णालयातील घटनेमुळे जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने आता अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी शहरातील 860 खासगी रुग्णालयांना नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्र शासन अधिसूचना 14 जानेवारी 2021 मधील नियम 11 (जे) मधील अनु क्र. 1 ते 3 चे पालन करताना आणीबाणीच्या
वेळेत रुग्णांस सेवा देताना अनामत रक्कम घेऊ नये. महाराष्ट्र शासन अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे सर्व शुश्रूषागृहे रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा विचार न करता गंभीर रुग्णांना प्राधान्याने मूलभूत जीवितरक्षणाच्या सेवा देईल व जीवितरक्षणासाठीचे सुवर्णकालीन उपचार पध्दतीचे, निकषांचे पालन केले जाईल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यप्रमुख डॉ. बोराडे यांनी दिली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने अनामत रक्कम न आकारण्याची नोटीस दिल्यामुळे तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या टोल फ्री क्रमांकावर साधा संपर्क…
रुग्णालयांनी अनामत रक्कम भरण्याची तसेच वैद्यकीय नियमांचे पालन न केल्यास 18002334151 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
89 रुग्णालयांवर कारवाई
शहरातील 860 रुग्णालयांची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली. यात दर्जेदार सेवा, रुग्णांना सेवा मिळण्यास काही अडचणी आहेत का? या पाहणीसह रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक लावणे, टोल फ्री क्रमांक लावले आहे का? याची तपासणी केली जाते. या तपासणी मोहिमेदरम्यान 89 रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळून आल्याने याप्रकरणी आरोग्य विभागाने रुग्णालयांना नोटीस दिली आहे.
शहरात काही ठिकाणी कोणताही वैद्यकीय परवाना नसताना रुग्णांवर उपचार केल्याची माहिती समोर आली होती. तसेच, महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ लाटण्यासाठी बनावट रुग्णांची नावे दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी मोहीम कडक केली आहे.