महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ एप्रिल ।। तिन्ही समित्यांच्या अहवालातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून गर्भवतीला उपचार देण्यात हलगर्जीपणा झाल्याबाबत विश्लेषण करण्यात येत आहे. रुग्णालयाने ‘वैद्यकीय निष्काळजीपणा’ केल्याचे सिद्ध झाल्यास हे प्रकरण ससूनमधील वैद्यकीय समितीकडे येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीमध्ये वैद्यकीय अधीक्षक, मेडिसीन विभागप्रमुख, प्रसूती विभागप्रमुख आदींचा समावेश असतो. शासनाकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे प्रकरणाचा अभ्यास केला जातो. वैद्यकीय समितीकडे प्रकरण वर्ग झाल्यास आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
महिलेच्या मृत्यू प्रकरणात दीनानाथ रुग्णालयाकडून निष्काळजीपणा झाला की नाही, या अनुषंगाने ससून रुग्णालयातील वैद्यकीय मंडळाकडे पोलिसांनी पत्र दिल्यास त्याबाबत रुग्णालयातील समिती त्याचा लवकरात लवकर निपटारा करेल. कागदपत्रांच्या आधारे योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
– डॉ. यल्लपा जाधव, वैद्यकीय संचालक, ससून रुग्णालय