महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० एप्रिल ।। अमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणामुळे दापोली तालुक्यातील हर्णे बंदरातील मासळी व्यवसायाला फटका बसला आहे. कोळंबीचे दर 80 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे 350 रुपये प्रती किलो दराने विकली जाणारी कोळंबी ही 70 रुपयांपर्यंत घसरली आहे तर अमेरिकेच्या नव्या धोरणामुळे निर्यातीदरम्यान पूर्वीच्या 6 टक्क्यांऐवजी 26 टक्के कर भरावा लागणार आहे. यामुळे मासळी व्यवसाय चांगलाच कोंडीत सापडला आहे.
कोळंबीमुळे दापोली तालुक्यातील हर्णै बंदराला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते तर भारतातील कोळंबीचे जगात सर्वात जास्त आयात करणारा देश हा अमेरिका आहे. त्यात काही विशिष्ट जातीच्या कोळंबीला मागणी जास्त असते. मात्र, ट्रम्प सरकारच्या टॅरिफ धोरणामुळे कोळंबी व्यवसायास घरघर लागली आहे. यामुळे येथील अर्थकारण मंदावले आहे.
मच्छीमार आर्थिक संकटात सापडणार…
दापोतील हर्णै बंदरात आधीच मत्स्य दुष्काळासह सातत्याने नैसर्गिक संकटे तसेच वादळस्थिती अशी संकटे कायम आहेत. पर्सनेट मासेमारी, एलईडी मासेमारी अशी संकटेही या बंदरात मच्छीमारांसमोर आहेत. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवलंबलेल्या नव्या टॅरिफ धोरणामुळे बंदरातील मच्छीमार आर्थिक संकटात सापडणार आहेत.