Pune News : वाढत्या उन्हामुळे पुणेकर तहानले, पुरंदरसह आंबेगाव, जुन्नर, खेड या चार तालुक्यांमध्ये टँकर ने पाणी पुरवठा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ एप्रिल ।। पुणे शहर जिल्ह्यात उन्हाचा चटका अधिक वाढत असून, जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये आता टँकरद्वारे गावकऱ्यांची तहान भागविली जात आहे. सरकारीपेक्षा खासगी टँकरवरच नागरिकांची भिस्त आहे. जिल्ह्यात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात २२ गावे आणि १३२ वाड्या-वस्त्यांसाठी २० टँकर सुरू आहेत. दरम्यान, वाढत्या उन्हामुळे शहर आणि जिल्ह्यातून पाण्याची मागणी वाढू लागली आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात गेल्या वर्षभरापासून रिसे गावामध्ये टँकर सुरू आहे. त्याशिवाय आता जिल्ह्यात पुरंदरसह आंबेगाव, जुन्नर, खेड या चार तालुक्यांमध्ये २० टँकर सुरू आहेत. त्यात आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक ११ टँकर सुरू आहेत. एकूण २० टँकरपैकी केवळ तीन टँकर सरकारी आहेत. जुन्नरमधील दोन आणि पुरंदरमधील एका गावात सरकारी टँकर सुरू आहेत. उर्वरीत १९ गावांसह १३१ वाड्या-वस्त्यांसाठी खासगी टँकर सुरू आहेत.

‘जिल्ह्यात आंबेगावात १२, पुरंदरमध्ये एक, जुन्नरमध्ये चार आणि खेडमध्ये तीन असे २० टँकर सुरू आहेत. चार तालुक्यांतील २२ गावे आणि १३१ वाड्या वस्त्यांमधील ३८ हजार ७४६ नागरिक बाधित झाले आहेत; तसेच १७२१ पशुधन बाधित झाले आहेत. चार तालुक्यांतील पाणीटंचाईसाठी १८ कूपनलिका ताब्यात घेण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात जिल्ह्यातील टॅंकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात ६७ टँकर
पुणे विभागात सर्वाधिक सातारा जिल्ह्यात ४१ टँकर, पुणे जिल्ह्यात २०, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात अनुक्रमे दोन आणि चार असे एकूण ६७ टँकर सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप एकही टँकर सुरू नाही. पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमधील ६५ गावे आणि ४२१ वाड्या वस्त्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे; तसेच एक लाखांहून अधिक नागरीक; तसेच १८ हजार ५३६ पशुधन बाधित झाले आहेत. ६५ पैकी केवळ पाच टँकर सरकारी आहेत. त्याद्वारे नागरिकांची तहान भागविली जात आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *