आरटीईच्या दुसर्‍या प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी आज शेवटची संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ एप्रिल ।। शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील दुसर्‍या फेरीतील प्रवेशाची मुदत अखेर आज मंगळवारी (दि. 15) संपुष्टात येणार आहे.दुसर्‍या प्रतीक्षा यादीतून आत्तापर्यंत एक हजार 703 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. संबंधित फेरीला मुदतवाढ द्यायची की नवीन फेरी सुरू करायची, यासंदर्भातील निर्णय आज मंगळवारी घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे.

आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यातील आठ हजार 863 शाळांमध्ये 1 लाख 9 हजार 102 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 3 लाख 5 हजार 151 अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर 10 मार्चपर्यंत 69 हजार 693 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश 18 मार्चपासून सुरू करण्यात आले. त्यासाठी 24 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली. त्यानंतर 1 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर दुसरी फेरी 8 ते 15 एप्रिलदरम्यान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, दुसर्‍या प्रतीक्षा यादीत आत्तापर्यंत 1 हजार 703 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. नियमित आणि दोन्ही प्रतीक्षा यादी मिळून तब्बल 83 हजार 410 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणार्‍या आरटीई प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी साधारण चार फेर्‍या राबविण्यात येणार आहेत.

शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत जवळपास 83 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. दरवर्षी साधारण 82 ते 83 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतात. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रिया राबविण्यास जास्त वेळ लागणार नाही.

पुढील दोन फेर्‍या या महिन्यात पूर्ण होतील. सीबीएसई पॅटर्ननुसार इंग्रजी शाळा एप्रिल महिन्यात सुरू होऊन त्यांना मे महिन्यात सुटी लागते आणि पुन्हा जून महिन्यात शाळा सुरू होतात. त्यामुळे यंदा एप्रिलअखेर आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *