महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ एप्रिल ।। फडणवीस सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील आठ लाख लाभार्थ्यांना यापुढे मासिक हप्ता म्हणून १,५०० रुपयांवरून ५०० रुपयांवर कमी करण्यात आला आहे. कारण या ८ लाख महिला नमो शेतकरी महासन्मान निधी (Namo Shetkari Mahasanman Nidhi) योजनेतून आधीच १,००० रुपये मिळवत आहेत.
राज्यातील तब्बल ८ लाख लाडक्या बहिणींना आता यापुढे प्रत्येक महिन्याला फक्त ५०० रूपयांचा लाभ मिळणार आहे. कारण, त्या आधीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत १००० रूपयांचा लाभ घेत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार, लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो, पण प्रत्येक महिन्यांचा लाभ १,५०० रुपयांपेक्षा जास्त नसावा.
अर्जाची पुन्हा कसून पडताळणी
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कसून तपासणी सुरू केली आहे. फक्त पात्र महिलांनाच लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळावा, त्यासाठी सरकारकडून पुन्हा तपासणी केली जात आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी २.६३ कोटी अर्ज आले होते. तपासणीनंतर ही संख्या ११ लाखांनी कमी होऊन २.५२ कोटींवर आली. फेब्रुवारी आणि मार्च २०२५ मध्ये २.४६ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत.
सध्या प्रत्येक जिल्ह्यांतून आलेल्या अर्जांची तपासणी सुरू आहे. सर्व पात्र अर्जांची पुन्हा छाननी सुरू करण्यात आली आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुख्यमंत्री काय म्हणाले ?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची तपासणी केली जाईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले होते की, अर्जाच्या तपासणीनंतर लाभार्थ्यांची संख्या १० ते १५ लाखांनी कमी होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेचे निकष किंवा निधीमध्ये बदल करत नाही. फक्त पात्र लाभार्थ्यांनाच हप्ता मिळेल याची खात्री करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
लाडकी बहीण योजना पात्रतेचे ५ निकष
१. वय १८ ते ६५ वर्षांच्या मर्यादेत असावे.
२. लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावेत.
३. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
४. कुटुंबाकडे चारचाकी वाहन किंवा कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असता कामा नये.
५. इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांचा एकूण मासिक लाभ १,५०० रुपयांपेक्षा जास्त नसावा.