महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ एप्रिल ।। स्टेट बँक ऑफ इंडिया , बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या तिन्ही बँकांनी कर्ज दरामध्ये २५ बेसिक पॉइंट्सने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. आरबीआयच्या या निर्णयानंतर या तिन्ही बँकांनी आजपासून कर्जदर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करण्याचा निर्णय घेतला. या बँकांच्या निर्णयामुळे विद्यमान आणि नवीन कर्जदारांसाठी कर्जे स्वस्त होणार आहेत.
कर्ज दर कपातीच्या नवीनतम टप्प्यासह एसबीआयचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट ८.२५ टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे. एसबीआयने बाह्य बेंचमार्क आधारित लेंडिंग रेट (EBLR) देखील त्याच फरकाने ८.६५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. तसंच, आणखी एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने बँक ऑफ इंडियानेही अशीच कपात जाहीर केली आणि CIBIL स्कोअरच्या आधारे त्यांचा गृहकर्जाचा दर आता वार्षिक ७.९ टक्के असणार आहे.
गृहकर्जांव्यतिरिक्त एसबीआयने काही निवडक विद्यमान किरकोळ कर्ज उत्पादनांवरील व्याजदर २५ बेसिस पॉइंट्सने कमी केले आहे. ज्यामध्ये वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, मालमत्तेवरील कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि स्टार रिव्हर्स मॉर्टगेज कर्ज यांचा समावेश आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे घरांवरील कर्जासह सर्वच कर्ज स्वस्त झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने त्यांची ४०० दिवसांची विशेष ठेव योजना मागे घेतली आहे जी ७.३ टक्के व्याजदर देत होती.
बँक ऑफ महाराष्ट्रने रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट ९.०५ टक्क्यांवरून ८.८० टक्केपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेने देऊ केलेले सर्व किरकोळ कर्ज RLLR शी जोडलेले असल्याने या कर्ज दर कपातीचा फायदा गृह, कार, शिक्षण, सोने आणि इतर सर्व किरकोळ कर्ज उत्पादनांसाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना होणार आहे.बँकेकडून देण्यात आलेले गृह कर्ज वार्षिक ७.८५ टक्क्यापासून सुरू होईल तर कार कर्जाची किंमत वार्षिक ८.२० टक्क्यांपासून असेल.
९ एप्रिल रोजी आरबीआच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दर ०.२५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ६ टक्के केला. ही दोन महिन्यांमधील सलग दुसरी कपात होती. ज्यामुळे गेल्या दोन महिन्यांत रेपो रेट ५० बेसिस पॉइंट्सनी कमी झाले. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जाचा हफ्ता कमी झाला त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.