सुसाट वाहनचालकांना पुणे आरटीओचा दणका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ एप्रिल ।। महामार्गावर अतिवेगाने वाहने पळविणार्‍या 13 हजार 818 वाहनचालकांवर पुणे आरटीओने कडक कारवाई केली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असली तरीही बेदरकार चालकांची संख्या कमी होत नाही. आरटीओने स्पीडगनच्या माध्यमातून महामार्गाप्रमाणेच शहरात देखील कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार अतिवेग (ओव्हर स्पीड), हेल्मेट, सीटबेल्ट नसणे, इन्शुरन्स नसणे, सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमध्ये वाहने लावणे, ओव्हरलोड, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, वाहनाला मागील बाजूस रिफ्लेक्टर नसणे, वाहनाच्या काचा पूर्णत: काळ्या करणे, टेल लॅम्प/ ब्रेक लाइट चालू नसणे, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबरप्लेट, ड्रंक अँड ड्राइव्हसह विविध नियमभंगप्रकरणी आरटीओकडून कारवाई केली जाते. यातील फक्त अतिवेगाने धावणार्‍या 13 हजार 818 वाहनचालकांवर आरटीओकडून स्पीडगनच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे.

हुल्लडबाजांना आवरण्याची गरज
आरटीओकडून नियमभंग करणार्‍या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई आरटीओकडील वायुवेग पथके सर्वाधिक महामार्गावरच करतात. शहरात वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई होत असते. मात्र, अनेक वाहनचालक वाहतूक पोलिसांशीच वाद घालून पसार होतात. या हुल्लडबाजांना आवरण्यासाठी काही पथकांना शहरात देखील गस्त घालायला लावावी, अशी मागणी होत आहे.

लायसन्स तपासणीसाठी मोहीम राबवा…
शहरात हुल्लडबाजपणा करत, ट्रिपल सीट गाडी पळवत इतर वाहनचालकांना त्रास देणार्‍या बहुतांश तरुणाईकडे लायसन्सच नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे पुणे आरटीओने शहरात तरुणाईचे फक्त लायसन्स (परवाना) तपासणीसाठीच विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी ज्येष्ठ वाहनचालकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *