महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ एप्रिल ।। अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या टॅरिफ युद्धात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील आयात शुल्कात सूट दिली आहे.
हा निर्णय ‘यू-टर्न’ म्हणून पाहिला जात असला, तरी खरे कारण अमेरिका चीनवर असलेल्या दुर्मीळ खनिजांच्या आयातीवर अवलंबून आहे. या दरम्यान चीनने अमेरिकन पोल्ट्री उत्पादनांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. पनामा येथे चीनच्या वर्चस्वाला कमी करण्याचे प्रयत्न अमेरिकेने सुरू केले आहेत, तर चीनने समुद्रमार्ग मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. हे टॅरिफ युद्ध आता जागतिक अर्थव्यवस्थेवरही खोल परिणाम करत आहे.
US-China Trade War | तर अमेरिका स्वतःही अडचणीत येईल
टॅरिफ युद्ध सुरू केल्यास संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, आणि अमेरिका स्वतःही अडचणीत येईल, हे यामधून स्पष्ट होते. सध्या ट्रम्प यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक्सवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय जिनपिंग यांच्या इशाऱ्याचा परिणाम मानला जात आहे, मात्र, खरे कारण म्हणजे चीनने दुर्मीळ खनिजांची निर्यात थांबवली असून त्यामुळे अमेरिकेला ही आयात सक्तीने करावी लागत आहे.
ट्रम्प-जिनपिंग दरम्यान दरी वाढली
या टॅरिफ युद्धामुळे ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यातील संबंध अधिक ताणले गेले आहेत. चीनसाठी २० इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील शुल्क ट्रम्प यांनी कमी केले असले, तरी हा ‘यू-टर्न’ नाही, तर आर्थिक सक्ती आहे.
पनामावरून संघर्षाची नवी दिशा?
या युद्धात अमेरिका टॅरिफच्या आघाडीतून कमकुवत होत असल्यामुळे त्यांनी नवा मार्ग निवडला आहे. पनामावर चीनचा मोठा प्रभाव असून, अमेरिका तो कमी करण्याच्या हालचाली करत आहे. पण चीन शांत बसेल का? तर ‘नाही’. चीनने हे समजून घेतले आहे की हे टॅरिफ युद्ध कधीही गनिमी युद्धात रूपांतरित होऊ शकते, त्यामुळे चीनने समुद्रमार्ग मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे.
अर्धसंवाहक उत्पादन ठप्प, अमेरिकेची चिंता वाढली
दुर्मीळ खनिज अर्धसंवाहक निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. या खनिजांचा पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक उत्पादन कंपन्यांचे काम ठप्प झाले आहे. याचा मोठा फटका अमेरिकेतील वाहन व अंतराळ उद्योगांना बसत आहे.
त्यामुळे ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या संगणक, लॅपटॉप, डिस्क ड्राइव्ह, डेटा प्रोसेसिंग उपकरणे, अर्धसंवाहक, मेमरी चिप्स, फ्लॅट पॅनल डिस्प्ले यांसारख्या वस्तूंवर नवीन शुल्क लावलेले नाही. यामागील कारण म्हणजे ही उत्पादने चीनमधून आणणे भाग आहे, हे जिनपिंग यांनी ओळखले असून त्यांनी ट्रम्पच्या निर्णयाला ‘आशेचा किरण’ म्हटले आहे.
अमेरिकन पोल्ट्रीवर प्रश्नचिन्ह
चीनने अमेरिकन पोल्ट्री उत्पादनांवर प्रश्न उपस्थित केले असून सॅल्मोनेला या जीवाणूचा शोध यामध्ये लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक देशांनीही अमेरिकन पोल्ट्री आयातीची चौकशी सुरू केली आहे. पोल्ट्री उत्पादक कंपन्यांना पैसे न मिळणे, वाहतूक खर्च स्वतःकडून भरणे आणि बदनामी होणे या बाबींवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अमेरिका आपली परस्पर करनीती पूर्णपणे मागे घ्यावी. त्यांनी म्हटले की, “अमेरिकेने स्वतःच्या चुका सुधाराव्यात.” हे स्पष्ट आहे की ट्रम्प यांच्या टॅरिफ युद्धात यू-टर्न सुरू झाला आहे आणि जर तसे झाले नाही, तर चीनने दुसरा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही दिला आहे.