महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ एप्रिल ।। IRCTC Kedarnath Helicopter Service: केदारनाथ यात्रा लवकरच सुरु होणार आहे. या यात्रेला लाखो भाविक लांबून दर्शनासाठी येतात. जर तुम्ही ही यंदा यात्रेला जात असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने २०२५ च्या केदारनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे.
ही सेवा २ मे ते ३१ मे दरम्यान दररोज उपलब्ध असणार आहे. या सेवेचा उद्देश भाविकांना केदारनाथ मंदिरापर्यंतचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर बनवणे हा आहे.
हेलिकॉप्टर शटल सेवा तीन ठिकाणांवरून उपलब्ध असेल
फाटा: ६,०६३ रुपये (दोन्ही बाजूंचा प्रवास)
सिर्शी: ६,०६१ रुपये (दोन्ही बाजूंचा प्रवास)
गुप्तकाशी: ८,५३३ रुपये (दोन्ही बाजूंचा प्रवास)
हे मार्ग हिमालयातील अद्वितीय निसर्गदृष्यांवरून हवाई प्रवासाचा अनुभव देतात, ज्यामुळे प्रवासाची वेळ आणि कष्ट खूपच कमी होतात.
नोंदणी आणि हेलिकॉप्टर बुकिंग कशी करावी
हेलिकॉप्टरचं तिकीट बुक करण्यापूर्वी भाविकांनी केदारनाथ यात्रेसाठी उत्तराखंड पर्यटन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करणं आवश्यक आहे.
नोंदणी करताना नवीन वापरकर्त्यांनी खातं तयार करावं लागेल. त्यासाठी प्रवासाची माहिती, जसं की किती दिवसांचा प्रवास आहे, किती लोक आहेत आणि कोणत्या तारखांना जायचं आहे ही माहिती भरावी लागेल.
त्यानंतर “यात्रा नोंदणी पत्र” डाउनलोड करावं. हे पत्र हेलिकॉप्टर तिकीट बुक करताना लागणार आहे. यासाठी हेलियात्रा पोर्टलवर नोंदणी करावी लागते.
नोंदणी करताना मोबाइल नंबर आणि ईमेल टाकावा लागतो.
ओटीपी (OTP) आल्यावर तो टाकून लॉगिन करावं.
नंतर आपला यात्रा नोंदणी क्रमांक भरून, प्रवासाची तारीख, वेळ, किती प्रवासी आहेत हे निवडून पेमेंट करायचं.
प्रत्येक वापरकर्ता दोन तिकिटं बुक करू शकतो. एका तिकिटावर सहा लोक जाऊ शकतात.
बुकिंग रद्द आणि परतावा नियम
जर प्रवासाची योजना बदलली, तर बुकिंग रद्द करता येते. रद्दीकरण केल्यावर काही शुल्क वजा करून ५ ते ७ कामकाजाच्या दिवसात पैसे परत मिळतील. पण, प्रवासाच्या वेळेच्या २४ तास आधी रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जाणार नाही.
या सेवेला खूप मागणी असल्यामुळे तुमच्या सोयीच्या तारखांसाठी आधीच बुकिंग करून ठेवा. हेलिकॉप्टरने प्रवास केल्यामुळे वेळ आणि श्रम वाचतात, सोबतच सुंदर निसर्गदृश्यांचाही आनंद घेता येतो. त्यामुळे यंदाची केदारनाथ यात्रा तुमच्यासाठी सर्वात सोयीस्कर आणि खास ठरू शकते.