महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ एप्रिल ।। जिल्हाधिकारी कार्यालयात रिंग रोडच्या Pune Ring Road News : संदर्भात नुकतीच आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत ‘एमएसआरडीसी’चे सहसंचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Pune District Collector Jitendra Dudi) यांच्यासह खेड, हवेली तालुक्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. पश्चिम भागातील जमिनीचे संपादन पूर्ण होत आले आहे. त्या भागात कामांसाठी कंपन्यांना आदेश दिल्याने त्यांच्याकडून काम सुरू करण्यात आले आहे. पूर्व भागाच्या २६५ हेक्टर भूसंपादनापैकी आतापर्यंत ३० हेक्टरचे संपादन शिल्लक आहे. यासंदर्भात संपादनाचे निवाडे लवकर जाहीर करून संपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे निवाडे २५ एप्रिलपर्यंत पूर्ण करून येत्या पंधरा दिवसांत संपादन पूर्ण करण्यात येईल, असे हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी सांगितले.
पुण्याभोवतीचा रिंग रोड साकारताना सेवा रस्ते, विविध सुविधांसाठी पूर्व आणि पश्चिम भागातील अनुक्रमे १० आणि २२ गावांमधील जमिनीचे अतिरिक्त संपादन करावे लागणार आहे.‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’ने (एमएसआरडीसी) याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला असून लवकरच त्याची अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. याशिवाय पुरंदर तालुक्यातील चांबळी आणि हिवरे गावातील रिंग रोडची आखणी (अलायंमेंट) बदलल्याने दोन्ही गावांतील जमिनींचे संपादन केले जाणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘एमएसआरडीसी’तर्फे रिंग रोड केला जात आहे. या रोडसाठी पूर्व आणि पश्चिम भागातील हवेली, पुरंदर, खेड, भोर, मावळ आणि मुळशी या तालुक्यातील गावांमधली जमीन संपादित करण्यात आली आहे. आता रिंग रोडचे नऊ टप्प्यांच्या कामांचे कार्यादेशही देण्यात आले आहेत. सुमारे अडीच वर्षांत हे काम पूर्ण करण्याची मुदत महामंडळाने संबंधित कंपन्यांना दिली आहे. रिंग रोडजवळ सेवा रस्ते, विविध सुविधा तयार करण्यासाठी अतिरिक्त जमीन आवश्यक आहे. त्याकरिता महामंडळाने जिल्हा प्रशासनाकडे अतिरिक्त जमिनीची मागणी असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे.
पश्चिम भागात मावळ तालुक्यातील चांदखेड, उर्से, परंदवाडी, कासार आंबोली, मुळशी तालुक्यातील मुठे, घोटावडे, कातवडी, भोरमधील खोपी, हवेलीतील रहाटवडे, बहुली या गावांमधील काही प्रमाणात अतिरिक्त जमीन आवश्यक आहे. त्याशिवाय पूर्व भागातील नानोली तर्फे आकुर्डी, वडगाव, सुदुंबरे; तसेच हवेली तालुक्यातील लोणीकंद, बिवरी, कोरेगाव मूळ, बकोरी, वळती या गावांचा समावेश आहे. पुरंदर तालुक्यातील पवारवाडी, गराडे, दिवे, चांबळी, सोनोरी, थापेवाडी, हिवरे या गावातील काही जमीन अतिरिक्त म्हणून संपादित केली जाणार आहे. खेड तालुक्यातील खालुंब्रे, कुरोळी, सोळे, निघोजे, धानोरे आणि भोरमधील शिवरे या गावांमधली जमीन घेण्याचा प्रस्तावात समावेश आहे. पूर्व भागातील १० आणि पश्चिम भागातील २२ अशा ३२ गावातील काही जमिनींचा समावेश आहे.
चांबळी, हिवरेत संपादन
रिंग रोडसाठी जमीन संपादन करताना आखणीमध्ये चांबळी गावाचा समावेश होता. चांबळी गावातील जमीन संपादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. आता रिंग रोडसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाल्याने चांबळी, हिवरे या गावातील शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दाखविली आहे. नव्या आखणीनुसार, या गावातील जमीन संपादित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.