Pune Congress: पुण्यात आधी धंगेकर आता संग्राम थोपटेंच्या पाठोपाठ आणखी एका बड्या नेत्याचा राजीनामा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० एप्रिल ।। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर देखील राजकीय वर्तुळात पक्षांतर होतानाचं चित्र दिसून येत आहे. अशातच राज्यात काँग्रेसला लागलेली गळती सुरूच आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर, भोरचे माजी आमदार व काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर आहेत. आज ते त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यादरम्यानच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. काही नाराज नेते पक्ष सोडण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी आज आपला राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे दिला आहे.

https://www.instagram.com/rohan_survase_patil/?utm_source=ig_embed&ig_rid=88577ced-8f37-4d67-91cf-25a065b7e468

रोहन सुरवसे पाटील यांनी राजीनामा पत्रात काय म्हटलंय
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या राजीनामा पत्रात रोहन सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे की, “सरचिटणीस पदावर काम करत असताना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला प्रमाण मानून आजपर्यंत मी काम केले. कुठल्याही गटातटाच्या भानगडीत न पडता माझ्या खांद्यावर पक्षाची जी जबाबदारी आहे ती लक्षात ठेवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि पक्षाचे नाव चांगल्या पद्धतीने कायम अधोरेखित होईल अश्या आशयानेच मी आजवर काम करत आलोय. पक्षकार्यात मी नेहमीच सक्रियपणे काम केले आहे. जनप्रश्र्नांसाठी अनेक आंदोलने केली युवक काँग्रेसच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभागी राहिलो.

2021 सालच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सरचिटणीस पदावर निवडून आल्यानंतर संघटनेसाठी काम करत असताना या पदाला कायमच न्याय देण्याचे आणि पक्षाची गरिमा कायम राखण्यासाठी किंबहुना ती वृद्धिंगत करण्यासाठी मी सदैव कटिबध्द राहिलो आहे.

काँग्रेस हा एक विचार आहे. हा विचार आणि हा पक्ष आजही तळागाळातील आणि गावकुसातील सर्वसामान्यांपासून ते मध्यमवर्गीय ते श्रीमंत अश्या सर्व स्तरातील लोकांना आपलासा वाटतो. मात्र, पक्ष संघटनेतील अनेक बाबी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पटत नाहीत. सध्या पक्ष अडचणीच्या काळातून जातोय तरीही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतोय याचा विचार पक्षनेतृत्वाने करावा अशी माझी अपेक्षा आहे.”

कोण आहे रोहन सुरवसे पाटील?
काँग्रेसचे आक्रमक युवा नेते म्हणून रोहन सुरवसे पाटील यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. पुणे शहरात काँग्रेसच्या विविध आंदोलनात ते सक्रिय सहभाग असत. खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल विधान केले होते. त्याला समर्थन देत रोहन पाटील यांनी सारसबाग येथील सावरकर पुतळ्याजवळ “माफीवीर” असा बॅनर लावला होता. यानंतर रोहन सुरवसे पाटील यांना अटक झाली होती.

भोरच्या संग्राम थोपटेंचा पक्षाला राजीनामा
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे यांनीही काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते रविवारी मेळावा घेणार आहे. ते मेळाव्यातून भाजपमध्ये जाण्याबाबत भूमिका मांडणार आहे. थोपटे परिवार चार दशकांपेक्षा जास्त काळ काँग्रेसमध्ये होता. अनंतराव थोपटे सहा वेळा तर संग्राम थोपटे तीन वेळा आमदार झाले होते.

संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेसला राजीनामा (Sangram Thopate Resignation to Congress) दिला आहे. ते लवकरच भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. हा पक्ष प्रवेश करण्याच्या आधी थोपटे यांनी आज (20 एप्रिल ) काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून ते आपली पुढील घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीला तालुक्यातील सर्व समर्थक उपस्थित राहणार असल्याची ही चर्चा आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते. त्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळातील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याने राज्यात हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *