महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० एप्रिल ।। चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर आली आहे. या कंपन्यांवर पोलिसांनी धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला आहे. विविध ब्रँडच्या नावाखाली विकले जाणारे अनेक शर्ट पोलिसांनी जप्त केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यूएस पोलो असन ट्रेडमार्क कंपनीच्या बनावट शर्टची हडपसर भागातील महादेवनगरमध्ये असलेल्या रॉयल मेन्स कलेक्शन येथे विक्री केली जात असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी या दुकानात छापेमारी करून माल जप्त केला आहे. या छापेमारी मध्ये पोलिसांना यूएस पोलो असन या कंपनीचे नाव वापरून दुसऱ्याच कंपनीचे शर्ट विकत असल्याचे दिसून आले. पुण्यात ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकले गेले. यूएस पोलो असन ही जागतिक पातळीवरची नामांकित शर्ट बनवणारी कंपनी आहे. देशातील अनेक शहरात त्यांचे मोठे मोठे स्टोअर आहेत. तसेच अनेक शॉपिंग मॉलमध्ये त्यांचे शर्ट विक्रीसाठी उपलब्ध असतात. अशातच पोलिसांच्या छापेमारीत ४ लाख ८ हजार रुपयांचे ५१० शर्ट जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी ते सर्व जप्त करुन गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
काय होते चितळे प्रकरण ?
नमकीन श्रेणीत चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी लोकप्रिय आहे. पण काही ग्राहकांनी बाकरवडीची चव बदलल्याची तक्रार केली. हा प्रकार कळल्यावर चक्रावलेल्या नितीन दळवी यांनी बाजारात चौकशी सुरू केली. काही पाकिटे विकत घेऊन पाहणी केली. यावेळी चितळे नावाशी साधर्म्य साधणारा एक नवा ब्रँड बाजारात आल्याचे आणि हा ब्रँड ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी आणि चितळे स्वीट होम यांची पुणेरी स्पेशल बाकरवडी या दोन्हीत तफावत आहे. पण पॅकिंगवर चितळे बंधू मिठाईवाले यांचा अधिकृत ई-मेल आयडी, ग्राहक क्रमांक (कंझ्युमर नंबर), मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स, संपर्क क्रमांक छापला होता. हा प्रकार करुन चितळे स्वीट होम हे त्यांची बाकरवडी ही चितळे बंधू मिठाईवाले यांचीच बाकरवडी असल्याचे भासवून विकत होते.