महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ एप्रिल ।। महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना (Pink E Rikshaw Scheme) सुरु करण्यात आली आहे. महिलांना रोजगार निर्माण व्हावा, यासाठी महिला व बालविकास विभागाअंतर्गत ही योजना सुरु करण्यात आली आहे. आता या योजनेअंत्रगत १० हजार पिंक ई- रिक्षांचे वाटप करण्यात आले आहेत.
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरात महिलांना पिंक रिक्षाचे वाटप केले. आज अजित पवार हेदेखील पुण्यात महिलांना पिंक रिक्षांचे वाटप करणार आहे. एकूण ८ जिल्ह्यातील १० हजार महिलांना या रिक्षा वाटप केल्या जाणार आहे. यात नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अहिल्यानगर, अमरावती,कोल्हापरूचा समावेश आहे.
पिंक ई-रिक्षा योजना आहे तरी काय?
महिलांना स्वतः च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना नियमित रोजगार मिळावा यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. यात महिलांना पिंक ई-रिक्षा घेण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.
या योजनेत पिंक रिक्षाच्या (Pink E-Rikshaw Scheme) किंमतीपैकी २० टक्के अनुदान हे राज्य सरकार देणार आहे. तर १० टक्के रक्कम ही महिलांना द्यावी लागणार आहे. उरलेली ७० टक्के रक्कमेसाठी सवलतीच्या दरात राज्य सरकार कर्ज उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे महिलांना कमीत कमी किंमतीत ही रिक्षा मिळणार आहे.या रिक्षाद्वारे महिला स्वतः चा व्यवसाय सुरु करु शकणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
काल नागपुरात झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी महिलांना पिंक रिक्षाचे वाटप केले. याबाबत ते म्हणाले की, दहा हजार महिलांना या रिक्षा देण्याचे उद्दिष्ट आहे. याचसोबत महिलांना सुरक्षित सार्वजनिक वाहतूकीचे साधव मिळावे. महिला रात्री पिंक रिक्षाने सुरक्षित फिरु शकतील, हे उद्दिष्टही यामागे आहे. नागपुरात काल २००० पिंक रिक्षाचे वाटप केले. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच पिंक ई-रिक्षा योजना आहे. महिलांना स्वतः च्या पायावर उभं राहता आलं पाहिजे, हा यामागचा उद्देश आहे.