राज्यात उष्णतेचा प्रकोप :, ‘या’ जिल्ह्यांत तापमान आणखी वाढणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ एप्रिल ।। राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. राज्यात उन्हाने होरपळ होत असून बहुतांश शहरातील पारा 42 अंशावर पोहोचला आहे. त्यामुळं हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. येत्या दोन दिवसांत तापमान दोन ते तीन अंशाने वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हाने जीवाची काहिली केली आहे. गेल्या तीन दिवसांतच पाऱ्याने ४० हून ४५ अंश सेल्सियसपर्यंत मजल मारली आहे. रविवारपासून तीन दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे.

बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांतील लोकांना घरातून बाहेर पाय काढणे मुश्किल झाले आहे. हवामान विभागाने सोमवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, नागपूर या शहरांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि उपनगरांत रविवारी सामान्य तापमान गेल्या काही दिवसांच्या तुलनेत अधिक नोंदवले गेले. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीरसह २० राज्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भात उष्णतेचा प्रकोप
विदर्भात उष्णतेचा प्रकोप सुरूच असून विदर्भात चंद्रपूरमध्ये आज सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे चंद्रपूर मध्ये 44.6°c तापमान असून विदर्भात पाच जिल्ह्यांमध्ये पारा 44च्या वर तापमानाचा पारा पोहोचला आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.

चंद्रपूरचे तापमान देशात सर्वोच्च तर जगात चौथ्या क्रमांकावर
चंद्रपूरचे तापमान रविवारी देशात सर्वोच्च तर जगात चौथ्या क्रमांकावर असल्याची नोंद झाली आहे. 44.6°c तापमानामुळे चंद्रपुरात उष्णतेची लाट असल्याचे पाहायला मिळतेय. गेले 48 तास वादळ -वारा व पाऊस अनुभवलेल्या चंद्रपूरने रविवारी 44.6°c तापमानासह देशात सर्वाधिक तापमानाची नोंद केली. चंद्रपूर जिल्हा तापमानाच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला. चंद्रपुरात या तापमानामुळे दुपारच्या सुमारास शुकशुकाट दिसून आला तर चंद्रपूरच्या एरवी कमी उष्ण असणाऱ्या रात्री देखील सर्वोच्च तापमानाच्या नोंदविल्या जात आहेत. यामुळे शहरातील वाहतूक मंदावली असून आगामी काळात देखील अशाच पद्धतीने चढते तापमान राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या तापमानामुळे घरातील कुलर्स अथवा एसी देखील थंडावा देईनासे झाले असून पाणीटंचाईची परिस्थिती भीषण होत चालली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान
मुंबई ३३.६०से.
अकोला ४४.३० से.
अमरावती ४४.४०से.
चंद्रपुर ४४.६०से.
नागपूर ४४.००से.
वर्धा ४४.००से.
परभणी ४२.४०से.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *