Gold Price Today: सोन्याच्या दरवाढीचा नवा विक्रम ; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ एप्रिल ।। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ (व्यापार युद्ध) मुळे अनिश्चिततेमुळे सोन्याची झळाळी कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारात सोन्याचे दार दररोज नवनवीन विक्रमी उच्चांकावर झेप घेत आहेत. गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावरील विश्वास कमी झाला असून सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात सोन्याकडे वळत आहेत. अशा स्थितीत, सोमवारी सकाळ होताच सोन्याचा भाव नवीन विक्रमी उच्चांकावर उसळी घेतली आहे.

सोन्याच्या दरवाढीचा नवीन उच्चांक
MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या वायदा दरांनी एक लाखाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आणि सोमवारी बाजार उघडताच सोन्याने सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये प्रति 10 ग्रॅम 96,747 रुपयांचा नवीन उच्चांक गाठला. सोमवार, 21 एप्रिल रोजी सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या आर्थिक परिणामांबद्दलच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आणि कमकुवत डॉलरमुळेही दरवाढीला आधार मिळाला. अशा स्थितीत, सोमवारी बाजार उघडताच MCX वर जून सोन्याचा वायदा भाव 1.36 टक्क्यांनी वाढून 96,552 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. शुक्रवारी गुड फ्रायडे असल्याने बाजार बंद होता तर, शनिवार आणि रविवारी बाजार बंद राहतो. अशा स्थितीत, तीन दिवसांनी बाजार उघडल्यावर सोन्याच्या दरांनी उंच उडी घेतली आहे.

भारतात सोन्याचा नवा उच्चांक
MCX प्रमाणेच सराफा बाजारातही भारतात सोन्याचा दर सर्वकालीन उच्चांकी पातळीवर आहे. मात्र, सोमवार, 21 एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीत थोडासा बदल झाला. गेल्या एका आठवड्यात सोने सुमारे 2,000 रुपयांनी महागले आणि 97 हजार रुपयांच्या पुढे गेले. कमकुवत डॉलरमुळेही सोन्याच्या दरवाढीला आधार मिळत आहे. डॉलर निर्देशांक तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सोन्याचे आकर्षण वाढत आहे. सोन्याची किंमत डॉलरमध्ये मोजली जाते त्यामुळे, अमेरिकन चलन कमकुवत झाल्यास इतर चलनांमध्ये सोने स्वस्त होते, ज्यामुळे मागणी वाढते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर आकारणीवर 90 दिवसांसाठी विराम देण्याची घोषणा केली पण, चीनविरुद्ध त्यांची भूमिका आक्रमक आहे. त्यामुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील मोठ्या व्यापार युद्धामुळे जागतिक आर्थिक वाढीचा दीर्घकाळ कमकुवत होण्याची भीती निर्माण झाली आहे.

आता पुढे काय?
ट्रम्पच्या शुल्कामुळे अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची भीती अनेक ब्रोकरेजनी व्यक्त केली असून येणाऱ्या आर्थिक आकडेवारीवरून अमेरिकेसह जगाच्या अर्थव्यवस्थेत समस्या आहेत याची पुष्टी होईल. मंगळवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) त्यांच्या नवीन अंदाजांमध्ये वाढीचा अंदाज कमी करेल असे निश्चित मानले जात आहे. तसेच, पीएमआय (पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्सेस) डेटावर जग लक्ष ठेवून असेल जे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे टॅरिफ लागू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेचे मोठे चित्र सादर करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *