महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ एप्रिल ।। पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) उभारलेले माण व चऱ्होली ई-डेपो शुक्रवारपासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. त्यामुळे पीएमपीचे आता सात ‘ई-डेपो’ होणार असून प्रवाशांना ई-बसच्या माध्यमातून अधिक चांगली सेवा देता येणार आहे. या दोन्ही ‘ई-डेपो’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.
अशी असेल सेवा –
पुणे शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता पीएमपीच्या बस संचलनाचा विस्तार व कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी हे नवे ‘ई-बस’ डेपो उभारण्यात आले आहेत. चऱ्होली ‘ई-बस’ डेपोतून ६० बसेस व माण ‘ई-बस’ डेपोतून ३२ बसेस प्रवाशांच्या सेवेत असणार आहेत. पीएमपी मोबाइल अॅपद्वारे लाइव्ह ट्रॅकिंग, थांब्यांची उद्घोषणा यांसारख्या आधुनिक सुविधा आता या मार्गावर उपलब्ध असतील. माण परिसर ‘आयटी हब’ असल्याने तेथील प्रवाशांना या बसचा लाभ होईल.
‘चऱ्होली’चा लाभ कोणास ?
चऱ्होली येथील डेपो सुरू झाल्यानंतर लोहगाव, विश्रांतवाडी, आळंदी, वाघोली, विमाननगर आणि विमानतळ परिसरातील प्रवाशांना नव्या ‘ई-बस’ डेपोचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. हा डेपो पीएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांना शहरांशी जोडणारे महत्वाचे दळणवळणाचे केंद्र ठरणार आहे. येथून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांसाठी ई-बस सुरू होतील. पुण्यातील या नव्या ई-बसमुळे स्थानिक प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. त्यांना ई-बसमुळे चांगली सुविधा मिळणार असून त्यांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल. या दोन नव्या ई – डेपोमुळे शहराच्या विविध भागांमध्ये कनेक्टिविटी वाढणार असून त्याचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
– ४९० पीएमपीच्या एकूण ‘ई-बस’
– पुणे स्टेशन, भेकराईनगर, वाघोली, बाणेर, निगडी पीएमपीचे एकूण ई-डेपो’
– माण, चऱ्होली पीएमपीचे नव्याने सुरू होणारे ‘ई-डेपो’