![]()
महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २४ ऑगस्ट -प्रवासी तसेच आंतरराज्य मालवाहतुकीसाठी कोणतीही बंधने असू नयेत, असे केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारेंना कळवले आहे. केंद्रीय राज्य सचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे.
त्यामुळे राज्यात ई पासची सक्ती रद्द होणार का? याची चर्चा सुरु झाली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात चर्चा करून पुढील निर्णय कळवला जाईल असे म्हटले होते. त्यांनी आता ट्विट करून राज्यात सध्या सुरु गाईडलाईन्स पुढील आदेशापर्यंत कायम राहतील, असे म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार राज्यात सध्या असलेल्या गाईडलाईन्स पुढील आदेशापर्यंत कायम राहतील.
दरम्यान, अनलॉक-३ च्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष वेधून भल्ला म्हणाले की, अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे वस्तू व सेवांच्या आंतरराज्यीय वाहतुकीत अडचणी निर्माण होतात आणि पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम होतो. यामुळे आर्थिक घडामोडी किंवा नोकरीमध्ये अडथळा निर्माण होतो. ते पत्रात म्हणाले की अनलॉक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की आंतरराज्य व राज्यांमध्ये व्यक्ती किंवा वस्तूंच्या वाहतुकीवर कोणतेही बंधन असू नये.
