महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – कोलकात्ता – दि. २४ ऑगस्ट -बीसीसीआयने आगामी मोसमाची आखणी करायला पाऊल उचलले आहे. अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी संलग्न राज्य संघटनांना पत्र लिहून याबाबत कळवले आहे. त्यानुसार हिंदुस्थानचा संघ या वर्षी ऑस्ट्रेलियाला मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर पुढल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हिंदुस्थानचा संघ मायदेशात इंग्लंडशी दोन हात करील. तसेच एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा आयपीएलचे आयोजन केले जाईल. याचा अर्थ पाच महिन्यांच्या अंतरात दोन आयपीएल खेळवण्यात येणार आहेत. तसेच अशी भूमिका सौरभ गांगुलीकडून घेण्यात आली आहे.
इंग्लंडचा संघ या वर्षी सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात हिंदुस्थान दौऱयावर येणार होता, पण कोरोनामुळे हा दौरा स्थगित करण्यात आला. आता पुढल्या वर्षी फेब्रुवारी – मार्च महिन्यात इंग्लंडचा संघ हिंदुस्थानशी दोन हात करणार आहे. या मालिकेत हिंदुस्थान – इंग्लंड यांच्यामध्ये झटपट मालिकेसह कसोटी मालिकाही खेळवण्यात येणार आहे, पण या मालिकेचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही. दरम्यान, त्याआधी या वर्षी तीन डिसेंबरपासून हिंदुस्थान – ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून क्रिकेट सुरू होण्याची शक्यता
हिंदुस्थानात ऑगस्ट महिन्यापासून क्रिकेटचा मोसम सुरू होतो, पण कोरोनामुळे यंदाच्या मोसमाचे वेळापत्रक अद्याप बनवण्यात आलेले नाही. मात्र नोव्हेंबर महिन्यापासून क्रिकेट मोसमाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा व रणजी या दोनच स्पर्धा या वर्षी खेळवण्यात येतील अशी माहितीही पुढे आली आहे, पण कोरोना नियंत्रणात आल्यानंतरच स्पर्धा सुरू होतील. तसेच खेळाडूंसह सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊनच या स्पर्धा खेळवण्यात येतील, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.