महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ मे ।। भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा अखेरच्या टप्प्यात असतानाच भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून बुधवारी निवृत्तीची घोषणा केली आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेनंतर भारताला इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी जायचे आहे. त्यापूर्वीच रोहितने कसोटीतून निवृत्त होण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे.
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला २० जूनपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेच्या मोहिमेला भारत आणि इंग्लंड सुरुवात करणार आहेत.
त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या नव्या पर्वापूर्वी रोहितने निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता भारतीय कसोटी संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. रोहित कसोटी संघाचा कर्णधारही होता.
मात्र ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२४ दरम्यान त्याच्या नेतृत्वात भारताला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत मायदेशात ३-० असा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारताला त्याच्या नेतृत्वात ३-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.
त्याची कामगिरीही या मालिकांमध्ये फारशी चांगली झाली नव्हती. त्यानंतरच त्याच्या कसोटी संघातील भविष्यावर प्रश्नचिन्ह होते. अखेर त्याने निवृत्तीची घोषणा करत या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडण्यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय निवड समितीची बैठक होणार आहे. त्यामुळे आता या बैठकीत नव्या कसोटी कर्णधाराचाही निर्णय होईल.
रोहित शर्माची कसोटीतील कामगिरी
रोहित शर्माने कसोटीत नोव्हेंबर २०१३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाताला झालेल्या सामन्यातून पदार्पण कले होते. त्याने ६७ सामने खेळले आहेत. या ६७ सामन्यात त्याने ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या. त्याने १२ शतके आणि १८ अर्धशतके ठोकली.
२१२ धावा ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम खेळी आहे. त्याने २०२२ ते २०२४ दरम्यान २४ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले. यामध्ये त्याने १२ सामने जिंकले, तर ९ पराभव स्वीकारले. ३ सामने अनिर्णित राहले.