महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ मे ।। पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा सूड भारताने आज पाकिस्तानवर हल्ला करुन घेतला आहे. भारताने मध्यरात्रीनंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणांवर हल्ला करुन 120 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. रात्री 1 वाजून 5 मिनिटं ते दीड वाजेपर्यंत भारताने केलेल्या या हल्ल्यामधील प्रत्येक घडामोडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बारीक लक्ष ठेऊन होते.
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरुद्धच्या भारताच्या मोहिमेला दिलेलं ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव सुद्धा पंतप्रधान मोदींनीच दिलं आहे. पहलगाममध्ये अनेक भारतीय महिलांच्या भांगेतील कुंकू दहशतवाद्यांनी पुसल्याने दहशतवाद्यांविरोधातील या मोहिमेला मोदींनी हे विशेष नाव दिलं. मात्र या नावावरुनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी 22 एप्रिल ते 7 मे दरम्यान हजेरी लावलेल्या कार्यक्रमांचा पाढाही राज यांनी वाचून दाखवला.
या सर्वांची काही आवश्यकता नाही
राज ठाकरेंनी दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नसू शकतं असं स्पष्टपणे म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी अमेरिकेवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा केला. कोणत्याही देशाविरुद्ध युद्ध पुकारलं नाही, अशी आठवण करुन दिली. तसेच राज ठाकरेंनी दहशतवाद्यांचा शोध घेणं, हा हल्ला का झाला याची माहिती घेणं अधिक महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. राज यांनी या विषयावरुन बोलताना, “ज्यावेळी पहलगाममधील हा प्रकार घडला तेव्हा पंतप्रधान सौदी अरेबियला होते. तो दौरा अर्धवट सोडून ते आले. त्यानंतर ते बिहारला आले. ही गोष्ट करायची गरज नव्हती. तिकडे केरळला जाऊन अदानीच्या कोर्टचं उद्धाटन केलं. मग इकडे फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी ‘वेव’चा कार्यक्रम केला. इतकी जर गंभीर परिस्थिती आहे, या तर या गोष्टी टाळत्या आल्या असत्या,” अशा शब्दांमध्ये सुनावलं. “या साऱ्यानंतर मॉक ड्रील करायचं, एअर स्ट्राइक करायचं या सर्वांची काही आवश्यकता नाहीये,” असंही राज म्हणाले.
युद्ध हे काही…
कॉम्बिंग ऑपरेशन करुन दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा केला पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना राज यांनी, “मूळ प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे. आज नाक्या-नाक्यावर ड्रग्ज मिळत आहेत. या गोष्टी येतात कुठून याच्या खोलाशी जाणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. शाळा कॉलेजमधली लहान लहान पोरं आता ड्रग्ज घ्यायला लागली आहेत. यांच्यापर्यंत ड्रग्ज पोहचतात कसं हे महत्त्वाचं आहे. युद्ध हे काही उत्तर नाही,” असंही म्हटलं.
सिंदूर नावावरुन साधला निशाणा
ऑपरेशन सिंदूर नाव दिलं आहे, असं म्हणत राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राज ठाकरेंनी, “नावंबिवं देऊन भावनिक होण्याचा आणि याचा इथे काही विषय नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की काय करताय? इतक्या दिवस जे काही कार्यक्रम झाले त्याची काही आवश्यकता नव्हती,” असंही राज ठाकरे म्हणाले.