महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ मे ।। भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला (Pahalgam Terror Attack Revenge) घेतला असून पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण केलं. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असं नाव देण्यात आलं होतं. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.
या घटनेनंतर केवळ पाकिस्तानमध्येच नाही तर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. भारताच्या या कारवाईवर अमेरिका, रशिया आणि चीनसह अनेक देशांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
दोन्ही बाजूंनी शांतता राखावी, अमेरिकेचे आवाहन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ही एक गंभीर परिस्थिती आहे. आम्हाला आशा आहे की लवकरच शांतता प्रस्थापित होईल. तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, अमेरिका या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि दोन्ही देशांशी संपर्कात आहे.
इस्रायलचा भारताला उघड पाठिंबा
भारताच्या कारवाईचे इस्त्रायलने उघड समर्थन केलं आहे. भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी म्हटलंय की, आम्ही भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन करतो. दहशतवाद्यांना त्यांच्या गुन्ह्यांची किंमत चुकवावी लागेल. इस्त्रायलने या आधीही भारताला पाठिंबा दिला आहे.
तणाव टाळा, चीनचे आवाहन
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानने शांतता राखावी आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनवणाऱ्या अशा कृती टाळाव्यात. चीनचे हे वक्तव्य राजकीय संतुलन दर्शवते. चीनचा पाकिस्तानला पाठिबा आहे पण उघडपणे भारताला विरोध केला गेला नाही.
संयुक्त राष्ट्रांचे आवाहन
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, आम्हाला नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील लष्करी कारवायांबद्दल चिंता आहे. भारत आणि पाकिस्तान दोघांनीही संयम बाळगावा.
युएईने संवादाला प्राधान्य दिले
आखाती देशांना दोन्ही बाजूंशी चांगले संबंध राखायचे आहेत. ते कोणत्याही लष्करी उपायापेक्षा राजनैतिक पर्यायांना प्राधान्य देतात. भारताच्या कारवाईवर युएईचे उपपरराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद म्हणाले की, तणाव शांततेने सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे राजनैतिक आणि संवाद.
भारताच्या सुरक्षेला रशियाचा पाठिंबा
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा म्हणाल्या की, आम्हाला भारत-पाकिस्तान तणावाची चिंता आहे आणि आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन करतो.
रशियाने या आधीच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ते भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचे समर्थन करतात. परंतु लष्करी कारवाईमुळे परिस्थिती बिघडू नये यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.
प्रादेशिक शांतता आवश्यक, कतारचे आवाहन
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑपरेशन सिंदूरवर म्हटले आहे की, आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे, विवेकाचा आवाज ऐकण्याचे आणि राजनैतिक मार्गाने समस्या सोडविण्याचे आवाहन करतो. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी हे आवश्यक आहे .