महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ मे ।। एकाचवेळी हवाई, जल आणि जमीन अशा तिहेरी मार्गाने भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्याने एकाच दिवसात जेरीस आलेल्या पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मुस्लिम राष्ट्रांकडे दयेची भीक मागायला सुरुवात केली आहे. दरम्यान, युद्ध तातडीने थांबवा आणि भारताशी चर्चेसाठी सज्ज व्हा, अशा शब्दांत अमेरिकेने मात्र पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे.
पाकमध्ये गृहयुद्ध भडकले
लाहोर, रावळपिंडी, कराचीसह पाकिस्तानातील प्रमुख १२ शहरांवर भारतीय हवाईदलाने गुरुवारी दिवसभरात जबरदस्त ड्रोन हल्ले चढवले. या स्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरून गेले असून, घबराट उडाली आहे. क्वेट्टा आणि लाहोरवरही भारताने रात्री उशिरा ड्रोन हल्ले चढवले. लाहोरमध्ये ‘आयएसआय’चे मुख्यालयही ड्रोन हल्ल्याने हादरले. बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीने उठाव केल्याने पाकिस्तानची कोंडी झाली आहे. अनेक शहरांत नागरिक रस्त्यावर उतरून पाक सरकारविरोधात घोषणाबाजी करीत आहेत. पाकमध्ये गृहयुद्ध भडकले असून, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर याला ताब्यात घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले. बुधवारी रात्री उशिरा अमृतसरमधील सुवर्ण मंदिरासह १५ ठिकाणी पाकने ड्रोन व मिसाईल हल्ले केले; पण ते हवाईदलाने हाणून पाडले. भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम (हवाई संरक्षण कवच) नष्ट करण्यात आली.
पाकने संयम बाळगावा : डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेले युद्ध थांबवून पाकिस्तानने भारतासोबत शांततेच्या वाटाघाटी सुरू कराव्यात, अशी अमेरिकेची भूमिका आहे. परिस्थिती चिघळवू देणे दोन्ही देशांच्या हिताचे नाही. याबाबत विशेषतः पाकने संयम बाळगावा.