CM Fadnavis On Metro : मेट्रो प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस ; CM फडणवीसांनी केले आश्वस्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ मे ।। ‘मुंबई व महानगरात चालू वर्षात ५० किमी तर, पुढच्या वर्षी ६२ किमीचा मेट्रोचा टप्पा सेवेत आणला जाणार आहे. २०१४ ते २०१९ दरम्यान काम सुरू करण्यात आलेले मेट्रो प्रकल्प येत्या दोन वर्षांत म्हणजेच २०२७ च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. त्याचा नागरिकांना प्रवासासाठी मोठा फायदा होईल’, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.

मिरा-भाईंदर दहिसर मेट्रो ९ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. मिरा-भाईंदरपासून पुढे विरारपर्यंत मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना विरारपर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार असल्याचे ते म्हणाले.

‘पालघर येथील वाढवण बंदर बुलेट ट्रेनने जोडले जाणार आहेत. बंदराला मेट्रोने ही कसे जोडते येईल, यासाठी विचार सुरू आहे’, असे ते म्हणाले. मिरा-भाईंदर-दहिसर मेट्रोचाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या सेवेत येणार आहे’, असे त्यांनी सांगितले. या मेट्रोमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडीतून दिलासा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मिरा-भाईंदर मेट्रोचे काम दहिसर ते काशिगाव आणि काशिगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान अशा दोन टप्प्यांत केले जात आहे. पहिल्या टप्याचे काम पूर्णत्वास आले असले तरी दुसऱ्या टप्प्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्यातील सेवा सुरू होण्यासाठी डिसेंबर २०२६ उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मेट्रो कामावरून शिंदेंचा ठाकरेंना टोला
‘मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पाला महायुती सरकारने २०१८ मध्ये मंजुरी दिली. मात्र, त्यानंतर स्थगिती सरकारमुळे मेट्रो कामाला मधल्या काळात ब्रेक लागला होता. आता पुन्हा आमचे सरकार येताच, आम्ही मेट्रो कामातील स्पीड ब्रेकर काढून टाकला’, असे सांगत शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरेंना टोला लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *