महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ मे ।। ‘ऑपरेशन सिंदूर’ने तडाखा दिल्यानंतर पाकिस्तान वठणीवर आले. शस्त्रसंधीनंतरही दोन्ही देशांमध्ये तणाव कायम असताना आता चीनच्या कुरापती सुरू झाल्या आहेत. दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा असल्याची घोषणा करणाऱ्या चीनने अरुणाचल प्रदेशातील तब्बल 27 ठिकाणांची नावे बदलून त्यांची यादीच जाहीर केली आहे. त्यामुळे आता भारत आणि चीन संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.
चीनने अरुणाचल प्रदेशातील 15 डोंगराळ, पाच रहिवासी परिसर, चार पर्वतरांगा, दोन नद्या आणि एका तलावाचे नाव बदलले असून त्यावर आपला दावा केला आहे. चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने 27 ठिकाणांच्या नावांची यादी चिनी भाषेत नकाशासह प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक ठिकाणाला चिनी मँडरीन भाषेत नाव दिले असून रोमन अंकांत त्या ठिकाणांचा क्रमही नकाशात दाखवण्यात आला आहे.