महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ मे ।। पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत कायम आहे. पुण्याच्या अप्पर इंदिरानगर भागामधील न्यू पद्मावतीनगरमध्ये कोयता गँगने अनेक वाहनांची तोडफोड केली. त्याचसोबत या कोयता गँगने काही नागरिकांना मारहाण देखील केली. याप्रकरणी नागरिकांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. हे सर्व आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन मुलांनी कोयत्याच्या सहाय्याने वाहनांची तोडफोड केली आणि नागरिकांना मारहाण केली. या कोयता गँगमधील गणेशला काही जणांनी न्यू पद्मावती नगर येथे मारहाण केली होती. याचा बदला घेण्यासाठी गणेश, अविष्कार आणि इतर अल्पवयीन मुलं शुक्रवारी रात्री न्यू पद्मावती नगर येथे कोयता आणि लाकडी दांडके घेऊन आले होते. तेथे बरीच शोधा शोध करुनही मारहाण करणारे भेटले नाहीत. यामुळे जाताना आरोपींनी रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांची कोयते आणि लाकडी दांडक्याने तोडफोड केली. यामध्ये एक रिक्षा आणि इतर दुचाकी वाहनांचा समावेश होता.
तोडफोडीचा आवाज ऐकून नागरिक घरातून बाहेर पडले. तेव्हा आरोपींनी त्यांना हत्यारांचा धाक दाखवून दहशत माजवली. त्यांनी काही नागरिकांना मारहाण देखील केली. दरम्यान काही नागरिकांनी मोबाईलमध्ये तोडफोडीचे चित्रीकरण केले. ते व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली. घटनेच माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बिबवेवाडी पोलिसांनी काही तासातच तांत्रिक तपासाव्दारे आरोपींचा माग काढला. त्यांच्याकडून तीन कोयते जप्त करण्यात आले आहेत.
वाहनांची तोडफोड आणि कोयत्याची दहशत दाखवणाऱ्या आरोपींविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी गणेश कोळी ( २० रा. न्यू पद्मावती नगर) आणि आविष्कार भालेराव (२० रा. न्यू पद्मावती नगर ) यांना अटक केले. तर इतर ९ जणांना ताब्यात घेतले. आरोपींचे कोणतेही पूर्वीचे रेकॉर्ड नाही तसेच ते कोणतेही कामधंदे करत नाहीत. यातील अल्पवयीन मुले १२ ते १७ वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.