महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ मे ।। राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं चित्र आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मान्सूनपूर्वी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहर आणि परिसरात काल (बुधवारी) सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातही सर्वच भागात दमदार पावसाने हजेरी लावली. लोणावळा, हवेली, गिरीवन, माळीण, पुरंदर भागातही जोरदार पाऊस झाला. मान्सून पूर्व पावसाने यापूर्वीचे दहा वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नाशिक, पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस जोरदार वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम किंवा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा अंदाज
दरम्यान, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांमध्येही मान्सूवपूर्व पावसाने थैमान घातले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर (घाटमाथ्यावर) आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे 21 ते 23 मेदरम्यान अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला असून, या तीनही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर कर्नाटक-गोवा किनारपट्टीलगत बुधवारी रात्री कमी दाबाचा पट्टा तयार झाला. जो पुढील 48 तासांत उत्तर दिशेने सरकत जाऊन गुरुवारच्या रात्रीपर्यंत तो मजबूत होऊन तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. कोकणात (मुंबईसह) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 25 मेपर्यंत केरळात
दरम्यान, मान्सून श्रीलंका, मालदीव ओलांडून काल(बुधवारी दि. 21) देशाच्या सीमेवर आला आहे. आता तो कधीही केरळ आणि कर्नाटकात येईल, अशी स्थिती आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 25 मेपर्यंत केरळात येईल. पुढील 6 ते 7 दिवसांत पश्चिम किनाऱ्यावर गुजरात, कोकण आणि गोवा, कर्नाटक आणि केरळ) या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.