महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ मे ।। मोठे सण उत्सव किंवा वाहतूककोंडीच्या काळात हमखास कॅबचे दर वाढलेले दिसतात. अशावेळी ग्राहकांना कधीकधी दुप्पट पैसे मोजावे लागतात. मात्र चालकांच्या या मनमानीला आता चाप बसणार आहे. राज्य सरकारने आता याबाबक कठोर निर्णय घेतला आहे.
सण-उत्सव काळात, तसेच गर्दीच्या वेळी होणारी प्रवाशांची लूट रोखण्यासाठी राज्य सरकारने मुंबईसह राज्यात अॅप आधारित टॅक्सीच्या अवाजवी भाडेवाढीला लगाम घातला आहे. मागणी वाढल्यानंतर मूळ भाडेदरात 1.5 पट मयार्देपर्यंत भाडेवाढ करता येणार आहे. तसे बदल अॅप आधारित प्रवासी सेवांच्या नियमांमध्ये करण्यात आले आहेत.
राज्य सरकारने मुंबईसह राज्यात अॅप आधारित प्रवासी सेवांच्या नियमांमध्ये मोठा बदल करून नवीन धोरण लागू केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी मंगळवारपासून करण्यात आली. भाडेवाढीबद्दल तक्रारी होत्या याची दखल घेऊन सरकारने ऑप आधारित टॅक्सीशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. किमान फेरी अंतर तीन किमी निश्चित केले आहे.
चालकास किमान ८० टक्के भाडे रक्कम अदा करणे बंधनकारक केले आहे. तक्रारींच्या जलद निवारणासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करणे अनिवार्य केले आहे. अॅपवर फेरी स्वीकारल्यानंतर रद्द केल्यास, चालकाला दंड व दंडाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा केली जाईल. तसेच ग्राहकाने विनाकारण फेरी रद्द केल्यास दंडाची रक्कम चालकाच्या खात्यात जमा केली जाईल.
नवीन धोरणानुसार, सर्व अॅग्रीगेटर कंपन्यांसाठी पोलिस पडताळणी आणि चालकांचे प्रशिक्षण अनिवार्य असेल. प्रत्येक वाहनात रिअल-टाइम ट्रॅकिंग, आपत्कालीन बटण आणि तक्रार निवारण प्रणाली असेल. महिला प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये फक्त महिला चालकांसह राईड शेअरिंग शक्य होईल. चालक आणि प्रवासी दोघांसाठीही विमा संरक्षण उपलब्ध असणे आवश्यक आहे.