“राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत”, ठाकरे कुटुंबियांबरोबर दीर्घ काळ सोबत राहिलेल्या नेत्याचं मोठं विधान!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ मे ।। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र येतील, अशी अटकळ बांधली जात आहे. त्याचपद्धतीने राजकीय वातावरणही तयार केलं जातंय. दोन्ही पक्षांच्या वतीने त्यासाठी सकारात्मकताही दाखवली आहे. मात्र, याबाबत दोन्ही पक्षनेतृत्त्व उघडपणे भूमिका घेताना दिसत नाहीत. त्यामुळे हे दोन्ही बंधू पुन्हा एकत्र येतील का? असा प्रश्न सामान्यांसह अनेकांना पडला आहे. यावर ठाकरे कुटुंबियांबरोबर दीर्घ काळ राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राज ठाकरेंना तुम्ही जवळून पाहिलंय, ते उद्धव ठाकरेंबरोबर जातील का?असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “वेलविशर म्हणून वाटतंय की पवार गटाने एकत्र यावं, ठाकरे गटाने एकत्र यावं. यात काहीही चुकीचं नाही. बाळासाहेबांबरोबर मी २५ वर्षे काम केलं आहे. मी राज ठाकरेंना लहानपणापासून पाहिलं आहे. कलानगरमध्ये शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी जेवणासाठी बाळासाहेब आणि वहिनीसाहेब राज ठाकरेंची वाट पाहायचे. राज ठाकरेंवर दोघांचंही खूप प्रेम होतं.”

राज – उद्धव एकत्र येणार नाहीत
“मी मंत्रीपदावर होतो, मला आठवतं की पुण्याचे वसंत चव्हाण राज्यसभेचे खासदार होते. त्यांचा मृतदेह घेऊन आर. आर. पाटील आणि मी पुण्याला निघालो होतो. मध्येच रेल्वेच्या डब्यात बॉम्बस्फोट झाले. त्यामुळे आर. आर. पाटील माघारी फिरले आणि मी एकटा पुढे गेलो. तेव्हा मी पहिल्यांदा दोन्ही भावांना (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) १२ वर्षांनी फोन केला. एक काम करा ७-८ दिवस काही बोलायचं नाही. माझा साधा विचार होता की राग ५-७ दिवसांनी कमी होतो. रिथिंकिंग सुरू होतं. ते थांबले, पण जे व्हायचं ते थांबलं नाही. राजकारणात काही गोष्टी नाही म्हणजे नाहीच होणार. म्हणजे उद्धव आणि राज एकत्र येणार नाहीत आणि पुढे काय होईल ते मला नाही माहीत”, असंही छगन भुजबळ पुढे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *