महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ मे ।। गेले चार दिवसांपासून कोसळणार्या मान्सूनपूर्व पावसाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा कमी असला, तरी अधून-मधून कोसळणार्या मुसळधार सरींमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शुक्रवारीही देवगड तालुक्यात पावसाचा जोर कायम होता. त्रिंबक – साटमवाडी – बांबर वाडीला जोडणारा कॉजवे पुराच्या पाण्याने वाहून गेला, तर मांगवली-ढवळेवाडी येथे लोंबकळणार्या वीज तारांचा शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला. देवगड तालुक्यातील हुर्शी-गडदेवाडी येथे जनावरांचा गोठा कोसळून सुमारे 40 हजार रुपयाचे नुकसान झाले. दरम्यान मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्र खवळला असून बंदर विभागाने किनारपट्टीवर धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावला आहे.